मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील मलबार हिल येथील अतिसुरक्षित आणि व्हीआयपी मानल्या जाणाऱ्या राजभवन परिसरात सोमवारी एक धक्कादायक घटना घडली. राजभवनाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) जवानाने ड्युटीवर असतानाच स्वतःच्या सर्व्हिस रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मृत जवानाचे नाव कौस्तुभ सांगळे (पोलीस अंमलदार) असे असून ते एसआरपीएफ ग्रुप क्रमांक १६, कोल्हापूर येथील तुकडीचे होते. सध्या त्यांची नियुक्ती मुंबईतील राजभवनाच्या सुरक्षेसाठी करण्यात आली होती. सोमवारी ते राजभवन परिसरातील ‘लोक भवन’ येथे गार्ड ड्युटीवर तैनात होते.
प्राथमिक माहितीनुसार, ड्युटीदरम्यान अचानक त्यांनी स्वतःच्या सर्व्हिस रायफलमधून स्वतःवर गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील इतर सुरक्षा कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. मात्र, तोपर्यंत सांगळे यांचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेनंतर संपूर्ण राजभवन परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच मलबार हिल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. घटनास्थळावरील शस्त्र आणि इतर पुरावेही जप्त करण्यात आले आहेत.
या आत्महत्येमागे कौटुंबिक कारण, मानसिक तणाव किंवा अन्य कोणते कारण आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच राजभवनातील सहकारी जवान, अधिकारी आणि संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू असून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.
राज्यपालांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेसाठी अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या राजभवन परिसरात घडलेल्या या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेबरोबरच जवानांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्नही पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आत्महत्येमागील नेमके कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.


