मुंबई प्रतिनिधी
राज्यात मान्सूनने पुन्हा एकदा रौद्ररूप धारण केले असून पुढील ४८ तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) शुक्रवारी राज्यातील अनेक भागांसाठी अतिवृष्टीचा गंभीर इशारा जारी केला आहे. कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून रायगड जिल्हा आणि पुणे घाट परिसरासाठी ‘रेड अलर्ट’, तर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरीसह नऊ जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. राज्यातील एकूण २६ जिल्ह्यांना विविध स्तरांचे पावसाचे अलर्ट जारी करण्यात आल्याने प्रशासनानेही सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि कोकणातील अनेक भागांत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुढील दोन दिवस पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर कोकणातील काही भागांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. दक्षिण कोकण-गोवा परिसर तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरही पावसाची तीव्रता कायम राहणार असून दरड कोसळणे, नदी-नाल्यांना पूर येणे आणि सखल भागांत पाणी साचण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता असून ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. मराठवाड्यातही अनेक जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज असून काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांचा इशाराही देण्यात आला आहे.
हवामान विभागाने रायगड आणि पुणे घाट परिसराला रेड अलर्ट, तर पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर घाट परिसर, सातारा घाट परिसर, अकोला, अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील २४ तास मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहू शकतात. त्यामुळे सखल भागांत पाणी साचणे, लोकल रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, जिल्हा प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नदीकाठच्या गावांतील नागरिक, डोंगराळ भागातील रहिवासी आणि पर्यटकांनी विशेष खबरदारी घ्यावी, अनावश्यक प्रवास टाळावा आणि हवामान विभाग तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मान्सूनचा जोर लक्षात घेता पुढील ४८ तास राज्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार असून संपूर्ण प्रशासनाची नजर हवामानातील घडामोडींवर लागून आहे.

