सिंधुदुर्ग प्रतिनिधी
वटपौर्णिमेच्या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे वटवृक्षाची पूजा करून व्रत पूर्ण केलेल्या विवाहित महिलेचा काही क्षणांतच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडली. ओटवणे-शेरवाळवाडी येथील सुमिता सुरेश राऊळ (वय ५५) यांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली असून, आनंद, श्रद्धा आणि मंगलमय मानला जाणारा वटपौर्णिमेचा दिवस त्यांच्या कुटुंबासाठी कायमची वेदना ठरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमिता राऊळ यांनी सोमवारी पहाटेपासून वटपौर्णिमेचे व्रत श्रद्धेने पाळले होते. पारंपरिक पद्धतीने पूजा साहित्याची तयारी करून त्या शेरवाळवाडी येथील ब्राह्मण मंदिराजवळ असलेल्या वटवृक्षाच्या पूजेसाठी गेल्या होत्या. इतर सुवासिनींसह त्यांनी विधिवत वटवृक्षाची पूजा केली, प्रदक्षिणा घातल्या आणि पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली. त्यानंतर महिलांमध्ये वाण देण्याचा आणि शुभेच्छांची देवाणघेवाण करण्याचा कार्यक्रम सुरू होता.
याच वेळी अचानक सुमिता राऊळ यांना अस्वस्थ वाटू लागले. सुरुवातीला किरकोळ त्रास असल्याचे वाटत असतानाच काही क्षणांत त्यांना तीव्र चक्कर आली आणि त्या जागीच कोसळल्या. हा प्रकार पाहताच उपस्थित महिलांमध्ये एकच खळबळ उडाली. महिलांनी तातडीने परिसरातील पुरुषांना बोलावले आणि तत्काळ त्यांना उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
पतीच्या दीर्घायुष्यासाठी श्रद्धेने व्रत करणाऱ्या एका सावित्रीचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने उपस्थित महिलांसह गावकऱ्यांनाही मोठा धक्का बसला. काही क्षणांपूर्वी हसतमुखाने वाण देत असलेल्या सुमिता राऊळ यांचे अचानक निधन झाल्याची बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरताच शेरवाळवाडी आणि ओटवणे गावात शोककळा पसरली.
सुमिता राऊळ या शांत, मनमिळावू आणि धार्मिक वृत्तीच्या म्हणून परिसरात परिचित होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, दीर, पुतणी असा परिवार आहे. संदेश राऊळ आणि समीर राऊळ यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाने राऊळ कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, वटपौर्णिमेसारख्या मंगलदिनी घडलेल्या या दुर्दैवी घटनेची चर्चा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू आहे. श्रद्धा, कुटुंबवत्सलता आणि आयुष्यभराच्या सहजीवनासाठी केलेली प्रार्थना पूर्ण होताच नियतीने घेतलेला हा क्रूर निर्णय अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आणणारा ठरला आहे.


