मुंबई प्रतिनिधी
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा चिंताजनकरीत्या घटून अवघ्या ७ टक्क्यांच्या आसपास आला असून, अप्पर वैतरणा धरणातील वापरण्यायोग्य पाणीसाठा पूर्णपणे संपुष्टात आला आहे. तानसा आणि भातसा धरणांतील साठाही तळ गाठत असल्याने मुंबईच्या पाणीपुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, पुढील काही दिवस मुंबई महानगर प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने जुलै महिन्यात धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
🚰 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल #MyBMCUpdates pic.twitter.com/K6N1aDlIjx
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 29, 2026
मुंबईत यंदा मान्सूनचे आगमन २३ जून रोजी झाले. सुरुवातीच्या दोन दिवसांत दमदार पाऊस झाला असला, तरी त्यानंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतली. परिणामी जून महिन्यात अपेक्षित पर्जन्यमानाची नोंद झाली नाही. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार यंदाचा जून महिना देशातील गेल्या १४६ वर्षांतील सर्वाधिक कोरड्या जून महिन्यांपैकी एक ठरला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील साठ्यावर त्याचा थेट परिणाम झाला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या ताज्या आकडेवारीनुसार, सातही धरणांमध्ये मिळून सध्या केवळ १ लाख २७९ दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा उपलब्ध असून, तो एकूण साठवण क्षमतेच्या ६.९३ टक्के आहे. मागील दिवशी हा साठा ७.०८ टक्के होता. विहार आणि तुळशी धरणांमध्ये पावसामुळे काही प्रमाणात वाढ झाली असली, तरी इतर प्रमुख धरणांतील पाण्याची पातळी घटल्याने एकूण साठ्यात पुन्हा घसरण झाली आहे.
अप्पर वैतरणा धरणातील वापरण्यायोग्य साठा संपला
महापालिकेच्या माहितीनुसार, अप्पर वैतरणा धरणात वापरण्यायोग्य पाणीसाठा शून्यावर पोहोचला आहे. तानसा धरणही जवळपास रिकामे झाले असून, मध्य वैतरणा धरणात केवळ ११.५३ टक्के पाणी उपलब्ध आहे. भातसा धरणातील साठा सहा टक्क्यांपेक्षाही खाली घसरला आहे. दुसरीकडे, विहार धरणात ४५.१३ टक्के, तर तुळशी धरणात २४.२६ टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे. या दोन्ही धरणांच्या परिसरात गेल्या २४ तासांत झालेल्या पावसाचा त्यांना काहीसा लाभ झाला आहे.
मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, भातसा, तानसा, मोडक सागर, विहार आणि तुळशी ही सात धरणे महत्त्वाची असून, ही सर्व धरणे प्रामुख्याने नैऋत्य मान्सूनवर अवलंबून आहेत. त्यामुळे जूनमध्ये पावसाने ओढ दिल्याचा परिणाम थेट पाणीसाठ्यावर दिसून येत आहे.
जुलैतील पावसाकडून मोठ्या अपेक्षा
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. २ जुलैपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यातील बहुतांश भागांसाठीही यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे. त्यामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यास पाणीसाठ्यात वेगाने वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मागील वर्षांच्या तुलनेत स्थिती कशी?
महापालिकेच्या आकडेवारीनुसार, जूनअखेरीस २०२४ मध्ये धरणांतील पाणीसाठा केवळ ५.४३ टक्के इतका होता आणि एकूण ७८,५७९ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होते. त्या तुलनेत यंदाचा साठा काहीसा अधिक असला, तरी २०२५ मधील परिस्थितीच्या तुलनेत पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे जुलै महिन्यातील पावसाचे प्रमाणच पुढील काही महिन्यांतील मुंबईच्या पाणीपुरवठ्याचे चित्र निश्चित करणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
मुंबईकरांसाठी सध्या दिलासादायक बाब म्हणजे मान्सूनने पुन्हा वेग पकडण्यास सुरुवात केली आहे. मात्र, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सलग आणि समाधानकारक पाऊस झाल्याशिवाय पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ होणार नाही. त्यामुळे आता संपूर्ण शहराचे लक्ष जुलै महिन्यातील पावसाकडे लागले आहे.


