पुणे प्रतिनिधी
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वेगाने बदलणाऱ्या युगात युवकांनी केवळ व्यावसायिक यश किंवा करिअरकेंद्री दृष्टीकोन न ठेवता भारतीय संस्कृती, नैतिकता, करुणा आणि सामाजिक जबाबदारी या मूल्यांचा अंगीकार करून नेतृत्व करावे, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत) विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांनी आपल्या मायदेशी परतल्यानंतर भारताच्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ या वैश्विक विचाराचा, समृद्ध संस्कृतीचा आणि मानवी मूल्यांचा संदेश जगभर पोहोचवावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
लवळे येथील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत) विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पदवीदान समारंभ-२०२६ मध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष तथा विद्यापीठाचे कुलपती प्रा. डॉ. एस. बी. मुजुमदार, प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रामन, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, मुंबईतील फ्रान्सचे महावाणिज्यदूत पॅट्रिक लेव्हेरिनो आणि सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष हेन्री तेबांडेके यांच्यासह विविध देशांतील विद्यार्थी उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले, जग सध्या परिवर्तनाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर असून कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शिक्षण, उद्योग, संशोधन, प्रशासन आणि दैनंदिन जीवनात मोठे बदल घडत आहेत. या बदलांच्या काळात युवकांनी ‘तुम्ही काय करता’ यापेक्षा ‘ते कसे करता’ याला अधिक महत्त्व द्यायला हवे. ज्ञान, कौशल्य आणि तंत्रज्ञान यांची सांगड नैतिकता, करुणा, प्रामाणिकपणा आणि संवेदनशीलतेशी घातली, तरच समाजाच्या विकासाला खरी दिशा मिळू शकेल, असे त्यांनी नमूद केले.
नेतृत्व म्हणजे केवळ राजकीय, प्रशासकीय किंवा संस्थात्मक पद नव्हे, तर प्रत्येक व्यक्ती आपल्या विचारातून, कृतीतून आणि आचरणातून समाजासाठी आदर्श निर्माण करू शकते, असे सांगताना त्यांनी भारतीय संस्कृतीतील ‘धर्म’ या संकल्पनेचा उल्लेख केला. धर्म म्हणजे कोणत्याही एका पंथापुरती मर्यादित संकल्पना नसून, मानवाला उन्नत करणारी मूल्ये जपणे आणि कर्तव्यनिष्ठ जीवन जगणे, असा त्याचा व्यापक अर्थ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महान संस्था या दूरदृष्टी असलेल्या व्यक्तिमत्त्वांच्या विचारातून उभ्या राहतात, असे सांगून राज्यपालांनी सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. एस. बी. मुजुमदार यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय तत्त्वज्ञानावर आधारित संस्था उभारून त्यांनी विविध देशांतील विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचे आणि शिक्षणाच्या माध्यमातून जागतिक बंधुभावाची भावना दृढ करण्याचे कार्य केले आहे. सिम्बायोसिस ही केवळ शैक्षणिक संस्था नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची, विचारसरणीची आणि सामाजिक जाणीवेची जडणघडण करणारे केंद्र असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सिम्बायोसिसमधून शिक्षण घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांवर विशेष सामाजिक जबाबदारी असल्याचे सांगताना राज्यपाल म्हणाले, “भारत सोडताना तुम्ही केवळ पदवी घेऊन जाऊ नका, तर भारतातील संस्कृती, विविधता, मैत्री, मानवी मूल्ये आणि पुण्याच्या समृद्ध शैक्षणिक परंपरेच्या अविस्मरणीय आठवणीही सोबत घेऊन जा. त्या अनुभवांचा उपयोग आपल्या देशात सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी करा.”
फ्रान्सचे महावाणिज्यदूत पॅट्रिक लेव्हेरिनो यांनी पदवीधर विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत भारत-फ्रान्स संबंध अधिक दृढ होत असल्याचे सांगितले. शिक्षण, संशोधन, नवोपक्रम, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या क्षेत्रांत दोन्ही देशांतील सहकार्य सातत्याने वाढत असून २०२६ हे ‘भारत-फ्रान्स नवोपक्रम वर्ष’ म्हणून साजरे केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
विद्यार्थ्यांनी जागतिक दृष्टीकोन स्वीकारत विविध संस्कृतींचा आदर करावा आणि मानवतेची भावना जपावी, असे आवाहन करताना त्यांनी फ्रान्समधील उच्च शिक्षण, संशोधन, तंत्रज्ञान क्षेत्रातील संधी, जागतिक दर्जाची विद्यापीठे तसेच भारतात कार्यरत असलेल्या ८०० हून अधिक फ्रेंच कंपन्यांमुळे उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधींचाही आढावा घेतला.
सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एस. बी. मुजुमदार यांनी भारतातील शिक्षण विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान देत नाही, तर भारतीय संस्कृती, लोकशाही, विविधतेतील एकता आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’ या मूल्यांचाही अनुभव देत असल्याचे सांगितले. परदेशातील शिक्षणामुळे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो, हे महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उदाहरणांतून स्पष्ट होते, असे नमूद करत त्यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी करावा, असे आवाहन केले.
प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर यांनी प्रास्ताविकात सिम्बायोसिसच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. विविध देशांतील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण, संशोधन आणि बहुसांस्कृतिक वातावरण उपलब्ध करून देण्याच्या विद्यापीठाच्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली. समारंभात विविध देशांतील विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या आणि जागतिक बंधुभाव, ज्ञानाची देवाणघेवाण तसेच भारतीय संस्कृतीच्या प्रसाराचा संदेश देत कार्यक्रम उत्साहात पार पडला


