सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्हा पोलीस दलाला हादरवून सोडणारी दुर्दैवी घटना शुक्रवारी पहाटे सातारा-वाई मार्गावर घडली. वाई पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेत कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलिस कॉन्स्टेबल श्रावण राठोड यांचा कार अपघातात जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत. आईच्या उपचारासाठी डॉक्टरांची भेट घेण्याच्या उद्देशाने ते साताऱ्याकडे निघाले होते. मात्र, नियतीने त्यांच्यावर घाला घातला.
अज्ञात वाहनाच्या हुलकावणीमुळे अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, श्रावण राठोड हे आपल्या आजारी आईच्या उपचारासाठी वैद्यकीय सल्ला घेण्याकरिता पहाटे पत्नीसह कारने साताऱ्याकडे जात होते. वाकेश्वर-बावधन गावाच्या हद्दीत आल्यानंतर अज्ञात वाहनाने अचानक हुलकावणी दिल्याने त्यांच्या कारवरील नियंत्रण सुटले. भरधाव कार रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन जोरदार आदळली.
अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या दुर्घटनेत श्रावण राठोड यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नींच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गुन्हे उकलण्यात हातखंडा
मूळ हिंगोली जिल्ह्यातील असलेले श्रावण राठोड हे वाई पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेत कार्यरत होते. गुन्ह्यांची उकल करण्यात त्यांचा विशेष हातखंडा होता. नुकत्याच एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अटक करून त्यांनी आपल्या तपास कौशल्याची छाप पाडली होती. त्यांच्या अकाली निधनामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघात की घातपात? चौकशीची मागणी
दरम्यान, या घटनेबाबत वाई परिसरातील नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले असून हा केवळ अपघात आहे की त्यामागे अन्य काही कारण आहे, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.
सहकाऱ्यांचा अश्रूंनी निरोप
शवविच्छेदनानंतर श्रावण राठोड यांचे पार्थिव वाई पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी सहकारी पोलिसांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. साश्रुनयनांनी त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी हिंगोली जिल्ह्यातील मूळ गावी रवाना करण्यात आले.
कर्तव्य बजावताना अनेक गुन्ह्यांचा छडा लावणारा एक धाडसी पोलिस अधिकारी आईच्या उपचारासाठी धावपळ करत असतानाच काळाच्या पडद्याआड गेल्याने संपूर्ण पोलीस दलासह नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.


