सातारा प्रतिनिधी
महाबळेश्वर आगारात नुकत्याच दाखल झालेल्या ‘राजमाता जिजाऊ’ या नव्या एसटी बसांचे प्रवासी आणि नागरिकांकडून स्वागत करण्यात आले आहे. आकर्षक रंगसंगती, आधुनिक स्वरूप आणि मजबूत बांधणीमुळे या बसांनी पहिल्याच नजरेत प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र, बसमधील ‘तीन बाय दोन’ आसनरचनेमुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबाबत नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
राज्य परिवहन महामंडळाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या या नव्या बसांमध्ये चालकाच्या बाजूला तीन आसनांची आणि वाहकाच्या बाजूला दोन आसनांची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे बसमधील मध्यवर्ती मार्ग तुलनेने अरुंद झाला असून प्रवाशांच्या हालचालींवर त्याचा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः तीन आसनांच्या रांगेत बसणाऱ्या प्रवाशांना दाटीवाटीचा अनुभव येत असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे.
महाबळेश्वर हे राज्यातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ असल्याने येथे वर्षभर मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची वर्दळ असते. येथून पुणे, मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच इतर लांब पल्ल्याच्या मार्गांवर नियमित बससेवा चालवली जाते. अशा परिस्थितीत दीर्घ अंतराच्या प्रवासासाठी या बसमधील आसनरचना कितपत सोयीस्कर ठरेल, याबाबत प्रवाशांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच सामानासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसमध्ये ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले. बसमध्ये एखादा प्रवासी उभा राहिल्यास दुसऱ्या प्रवाशाला मार्ग काढणेही कठीण होत असल्याचा अनुभव अनेकांनी व्यक्त केला. काही प्रवाशांनी तर या बसची अंतर्गत रचना प्रवासी बसपेक्षा मिनी ट्रॅव्हल्स वाहनांसारखी असल्याची प्रतिक्रिया दिली.
वाहकांनाही कामकाजात अडचणी
बसमधील अरुंद मार्गाचा परिणाम केवळ प्रवाशांवरच नव्हे, तर वाहकांच्या दैनंदिन कामकाजावरही होत असल्याचे समोर आले आहे. तिकीट वितरणासाठी बसच्या पुढील आणि मागील भागात फिरताना अडथळे निर्माण होत असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. विशेषतः गर्दीच्या वेळी प्रत्येक प्रवाशापर्यंत पोहोचणे कठीण जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना जलदगतीने बाहेर पडण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध राहील का, याबाबतही काहींनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे बसच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही या रचनेचा पुनर्विचार करण्याची मागणी होत आहे.
मजबूत बांधणीमुळे समाधान
दुसरीकडे, या बसांच्या मजबूत बांधणीबाबत मात्र प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. नव्या रंगरूपासह वाहनांची गुणवत्ता आणि टिकाऊपणा चांगला असल्याचे अनेकांचे मत आहे. त्यामुळे आसनरचनेतील काही त्रुटी दूर केल्यास या बसांना अधिक सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाचे स्पष्टीकरण
दरम्यान, या बसांच्या रचनेबाबत बोलताना महाबळेश्वर आगाराचे व्यवस्थापक महेश जाधव यांनी सांगितले की, ‘‘राजमाता जिजाऊ बसची रचना प्रवाशांच्या दैनंदिन सेवेला प्राधान्य देऊन करण्यात आली आहे. या बस प्रामुख्याने अल्प अंतरावरील आणि शटल स्वरूपाच्या प्रवासासाठी तयार करण्यात आल्या आहेत. अधिकाधिक प्रवाशांना बसण्याची सुविधा उपलब्ध करून देणे हा त्यामागील उद्देश आहे. या बस लांब पल्ल्याच्या सेवेसाठी नसून जवळच्या अंतरावरील प्रवासासाठी अधिक उपयुक्त आणि किफायतशीर ठरतील.’’
तथापि, प्रवासी आणि कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत असलेल्या सूचनांचा विचार करून आवश्यक त्या सुधारणा केल्यास या नव्या बससेवेला अधिक व्यापक स्वीकार मिळू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


