रणजित मस्के,प्रतिनिधी
सातारा : जुन्या भांडणाचा राग मनात धरून मित्राचा निर्घृण खून करणाऱ्या दोघा आरोपींना सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला असून, दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे.
या प्रकरणात राजेश बुधन टुडू (वय २५) आणि गणेश सोनाराम मुर्मू (वय ३०) यांना दोषी ठरविण्यात आले. आरोपींनी जुन्या वादातून १ जून २०२० रोजी देवगाव (ता. सातारा) येथील शिवारात रजू शिकार मुर्मू (वय २७) याचा मोठ्या दगडाने ठेचून खून केला होता. त्यानंतर मृताची ओळख पटू नये म्हणून त्याचा मोबाईल, पाकीट आणि इतर वस्तू नष्ट करण्याचाही प्रयत्न केला होता.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक एस. बी. हंकारे यांनी केला होता. पुढील तपास आणि न्यायालयीन कामकाज उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले आणि सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. तांबोळी यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड. गौरी लकडे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. या खटल्यात एकूण १३ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ आणि ३४ अन्वये दोन्ही आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या कारवाईत जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, सहाय्यक फौजदार राजेंद्र वंजारी, पैरवी अधिकारी शितल भोसले, पोलीस हवालदार तेजा तुपे आणि पोलीस अंमलदार सोनवणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.


