पुणे प्रतिनिधी
मराठी साहित्यविश्वासाठी अत्यंत महत्त्वाची आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे च्या विस्तीर्ण आणि निसर्गरम्य परिसरात २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. चार दिवस चालणारे हे संमेलन ऐतिहासिक, भव्य आणि संस्मरणीय स्वरूपात पार पडणार असून मराठी साहित्य संमेलनांच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला जाणार आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या रविवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संमेलनाचे स्थळ आणि तारखा यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी ही माहिती जाहीर केली. यावेळी महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर तसेच संमेलनाचे संयोजक असलेल्या समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे उपस्थित होते.
पुण्यातील १४वे साहित्य संमेलन; विद्यापीठात प्रथमच आयोजन
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात पुणे शहराला विशेष स्थान आहे. यापूर्वी पुण्यात १३ वेळा साहित्य संमेलनांचे आयोजन झाले असले तरी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात प्रथमच साहित्य संमेलन भरविले जाणार आहे. त्यामुळे शंभराव्या संमेलनाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
बैठकीत संमेलनाच्या आयोजनाशी संबंधित विविध पैलूंवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संमेलनासाठी आवश्यक असलेले विशाल प्रांगण, उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रशस्त वाहनतळ आणि मोठ्या प्रमाणावर उपलब्ध मनुष्यबळ या सर्व बाबींचा विचार करून विद्यापीठाची निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी यांनी संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठातील सुमारे दीड हजार प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचारी पूर्ण सहकार्य करतील, अशी ग्वाही दिली.
मुख्य इमारतीपासून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सपर्यंत कार्यक्रमांची रेलचेल
संमेलनातील प्रमुख कार्यक्रम विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील भव्य प्रांगण, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि “छत्रपती संभाजी महाराज सभागृह” येथे आयोजित करण्यात येणार आहेत.
याशिवाय विद्यापीठ परिसरातील छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळा परिसरात विशेष साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. येथे कविकट्टा, कथाकथन, मुक्तसंवाद, साहित्यिक गप्पा आणि नवोदित लेखकांसाठी विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. त्यामुळे संमेलन केवळ औपचारिक व्यासपीठापुरते मर्यादित न राहता साहित्यप्रेमींचा लोकउत्सव ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
शहरावरील ताण कमी करण्याचाही विचार
पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी आणि मोठ्या कार्यक्रमांमुळे निर्माण होणारा ताण लक्षात घेऊन विद्यापीठ परिसराची निवड करण्यात आली आहे. विस्तीर्ण जागा आणि स्वतंत्र सुविधा उपलब्ध असल्यामुळे साहित्यप्रेमींना अधिक सुसज्ज आणि सोयीस्कर वातावरण उपलब्ध होणार असल्याचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी स्पष्ट केले.
महाकोषाच्या व्याजातून विकसित होणार महामंडळाचे संकेतस्थळ
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या महाकोष निधीत सध्या सुमारे अडीच कोटी रुपयांची रक्कम उपलब्ध आहे. या निधीच्या व्याजातून महामंडळाचे स्वतंत्र आणि आधुनिक संकेतस्थळ विकसित करण्यात येणार आहे. साहित्य संमेलनांचा इतिहास, विविध उपक्रम, साहित्यिकांची माहिती आणि इतर संदर्भ साहित्य एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्याचा उद्देश या प्रकल्पामागे असल्याचे सोमण यांनी सांगितले.
पुढील दोन वर्षांत हे संकेतस्थळ पूर्णत्वास नेण्याचा मानस असून भविष्यात ते सातत्याने अद्ययावत ठेवण्यात येणार आहे.
‘नांदी शंभराव्या साहित्य संमेलनाची’ उपक्रमातून राज्यभर साहित्यिक जागर
शंभराव्या साहित्य संमेलनाची उत्सुकता राज्यभर निर्माण करण्यासाठी ‘नांदी शंभराव्या साहित्य संमेलनाची’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. पुणे आणि मुंबई वगळता महाराष्ट्रात ज्या ठिकाणी यापूर्वी साहित्य संमेलने झाली आहेत अशा ४८ शहरांसह राज्यातील विविध भागांत साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
१५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत राज्यभर ९९ साहित्यिक उपक्रम राबविले जाणार असून त्यामध्ये परिसंवाद, व्याख्याने, कविसंमेलने, कथाकथन, साहित्य चर्चा, पुस्तक प्रदर्शन आणि युवा साहित्यिकांसाठी विशेष कार्यक्रमांचा समावेश असेल.
सर्व साहित्यप्रेमींचे लक्ष आता पुण्याकडे
रविवारी झालेल्या निर्णायक बैठकीस ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह महामंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते. सर्वानुमते झालेल्या या निर्णयामुळे आता मराठी साहित्यविश्वाचे लक्ष पुण्याकडे लागले आहे.
मराठी भाषेचा, साहित्याचा आणि सांस्कृतिक परंपरेचा शतकीय उत्सव ठरणारे हे संमेलन केवळ साहित्यिकांची मेजवानी न राहता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक महत्त्वपूर्ण पर्व ठरणार असल्याची भावना साहित्यवर्तुळातून व्यक्त होत आहे.


