लातूर प्रतिनिधी
निसर्गाच्या अवकृपेने आधीच संकटात सापडलेल्या लातूर जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबाच्या अडचणी कमी होण्याऐवजी आणखी वाढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वीज पडून बैल दगावल्याने पत्नीला नांगराला जुंपून शेतीची मशागत करणाऱ्या शेतकऱ्याच्या मदतीसाठी राज्य सरकार आणि प्रशासन पुढे सरसावले होते. मात्र मदत म्हणून देण्यात आलेला बैल अवघ्या दोन दिवसांत आजारी पडल्याने आता त्याच्या उपचाराचा आर्थिक भुर्दंडही संबंधित शेतकऱ्यालाच सहन करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे.
विरोधक आणि माध्यमांच्या दबावामुळं लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याला नुकसानभरपाई म्हणून दिलेला बैल आजारी निघाला. आता त्याच्या उपचाराचाच खर्च संबंधित शेतकऱ्याला करावा लागतोय. शेतकरी कर्जमाफीची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. द्यायची म्हणून दिलेल्या कर्जमाफीमध्ये अटीशर्तीच जास्त लादून ती… pic.twitter.com/2epZXtHVoO
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 12, 2026
लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांचा एक बैल काही दिवसांपूर्वी वादळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटादरम्यान वीज कोसळून मृत्युमुखी पडला होता. शेतीसाठीचा प्रमुख आधार गमावल्याने गायकवाड कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले. ऐन पेरणीच्या हंगामात शेतीची कामे रखडू नयेत म्हणून त्यांच्या पत्नीने स्वतःच्या खांद्यावर जू घेऊन नांगरणी करण्याचा प्रयत्न केला. या हृदयद्रावक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती.
या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला तातडीने मदतीचे निर्देश दिले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासन आणि पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून स्थानिक गोशाळेतून एक बैल गायकवाड यांना उपलब्ध करून देण्यात आला. प्रशासनाने ही मदत तातडीने केल्याचा गाजावाजा झाला; मात्र प्रत्यक्षात दिलेला बैल कामासाठी सक्षम नसल्याचा आरोप आता पुढे येत आहे.
माहितीनुसार, शेतात मशागतीचे काम सुरू असताना हा बैल अचानक खाली बसला. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली असता तो आजारी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे बैलाकडून अपेक्षित काम होण्याऐवजी त्याच्या उपचारासाठीच खर्च करण्याची वेळ गायकवाड कुटुंबावर आली आहे. आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या या कुटुंबासाठी ही नवी डोकेदुखी ठरली आहे.
दरम्यान, या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करताना त्यांनी म्हटले की, विरोधक आणि माध्यमांच्या दबावामुळे शेतकऱ्याला नुकसानभरपाई म्हणून देण्यात आलेला बैल आजारी निघाला. आता त्याच्या उपचारासाठी संबंधित शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातून खर्च करावा लागत आहे. शेतकरी कर्जमाफीप्रमाणेच मदतीच्या नावाखाली केवळ दिखाऊ उपाययोजना केल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
“शेतकऱ्यांना मदत देताना सरकारने अटी-शर्तींचे ओझे लादण्याऐवजी मनापासून मदत करावी. शेवटी सरकारी तिजोरी ही जनतेचीच आहे,” असे रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शेतकऱ्याला देण्यात आलेल्या बैलाची आरोग्य तपासणी करण्यात आली होती का, तो प्रत्यक्ष शेतीकामासाठी सक्षम होता का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. तातडीच्या मदतीच्या नावाखाली गोशाळेतील आजारी बैल शेतकऱ्याच्या गळ्यात मारण्यात आल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे.
एका बाजूला सरकार शेतकरीहिताचे दावे करत असताना प्रत्यक्ष मदतीच्या अंमलबजावणीत गंभीर त्रुटी असल्याचे हे प्रकरण अधोरेखित करत असल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. संकटग्रस्त शेतकऱ्याला दिलासा देण्याऐवजी त्याच्या अडचणीत भर टाकणाऱ्या या प्रकाराची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे.


