कराड प्रतिनिधी
देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शहापूर गावचा जवान अर्जुन राजेंद्र जाधव (वय 30) यांना जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये वीरमरण आले. हॅन्ड ग्रेनेडच्या स्फोटात गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण शहापूर गावासह सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
अर्जुन जाधव हे भारतीय लष्कराच्या बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपचे जवान होते. सध्या ते जम्मू-काश्मीरमधील संवेदनशील उरी सेक्टरमध्ये 8 आरआर (राष्ट्रीय रायफल्स) युनिटमध्ये कार्यरत होते. देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक परिस्थितीत कर्तव्य बजावत असताना एका कारवाईदरम्यान हॅन्ड ग्रेनेडचा स्फोट झाला. या स्फोटात ते गंभीर जखमी झाले. सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने लष्करी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही त्यांना वाचविणे शक्य झाले नाही.
अर्जुन जाधव यांच्या वीरमरणाची बातमी समजताच त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. गावातील नागरिकांनीही हळहळ व्यक्त केली असून, शहापूर गावात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे. देशासाठी बलिदान दिलेल्या या सुपुत्राच्या स्मृतींना गावकऱ्यांनी अश्रुपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
लेकाचा पहिला वाढदिवस; पण वडिलांची प्रतीक्षा कायमची संपली
या घटनेतील सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे अर्जुन जाधव यांचा मुलगा येत्या 25 जून रोजी एक वर्षाचा होणार होता. आपल्या लेकाचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी अर्जुन जाधव यांनी 15 जूनपासून सुट्टी मंजूर करून घेतली होती. काही दिवसांतच ते घरी परतणार होते. कुटुंबीयांनीही त्यांच्या स्वागताची आणि मुलाच्या वाढदिवसाच्या तयारीची आखणी सुरू केली होती.
मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. लेकाच्या वाढदिवसाचे स्वप्न पाहणारा बाप त्याआधीच देशासाठी हौतात्म्य पत्करून गेला. त्यामुळे जाधव कुटुंबाच्या आनंदावर दुःखाची गडद छाया पसरली आहे. मुलाच्या पहिल्या वाढदिवशी वडिलांचे प्रेम मिळण्याऐवजी त्याच्या वाट्याला शहीद वडिलांचा अभिमान आणि आठवणीच येणार आहेत.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अर्जुन जाधव यांच्या पश्चात पत्नी, एक वर्षाचा मुलगा, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. कुटुंबाचा आधारवड हरपल्याने सर्वांनाच मोठा मानसिक धक्का बसला आहे. गावातील नागरिक आणि नातेवाईक मोठ्या संख्येने जाधव कुटुंबाच्या सांत्वनासाठी त्यांच्या घरी पोहोचत आहेत.
शुक्रवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शहीद अर्जुन जाधव यांचे पार्थिव शुक्रवारी त्यांच्या मूळ गावी शहापूर येथे आणण्यात येणार असून, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आपल्या गावच्या वीर सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या अर्जुन जाधव यांच्या शौर्याला संपूर्ण महाराष्ट्राचा सलाम. त्यांच्या बलिदानामुळेच देशातील नागरिक सुरक्षित आहेत, ही भावना प्रत्येकाच्या मनात दाटून आली आहे.


