लातूर प्रतिनिधी
वीज पडून एकमेव बैल दगावल्यानंतर शेतीची कामे सुरू ठेवण्यासाठी पत्नीला बैलाच्या जागी जूंपण्याची वेळ आलेल्या लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील काशिनाथ गायकवाड यांच्या कुटुंबाला अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या हस्तक्षेपानंतर प्रशासनाने अवघ्या काही तासांत नव्या बैलाची व्यवस्था केली असून, दगावलेल्या बैलाच्या नुकसानभरपाईची रक्कमही मंजूर करण्यात आली आहे.
भूमिहीन शेतमजूर असलेले काशिनाथ गायकवाड हे स्वतःची जमीन नसतानाही बैलजोडीच्या मदतीने परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात नांगरणी, वखरणी, मशागत आणि पेरणीची कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पत्नी हौसाबाई, मुलं आणि संपूर्ण कुटुंबाचा चरितार्थ या कामांवरच अवलंबून आहे. मात्र, खरीप हंगामाच्या तोंडावरच आलेल्या नैसर्गिक संकटाने त्यांच्या कुटुंबासमोर मोठे आर्थिक आणि सामाजिक आव्हान उभे केले होते.
वीज कोसळली आणि आधार हिरावला
गत ५ जून रोजी परिसरात झालेल्या वादळी पावसादरम्यान गायकवाड यांच्या बैलावर वीज कोसळून त्याचा मृत्यू झाला. बैलजोडीतील एक बैल दगावल्यानंतर शेतीची कामे ठप्प होण्याची भीती निर्माण झाली. आधीच आर्थिक अडचणींना सामोरे जाणाऱ्या या कुटुंबाकडे नवीन बैल खरेदी करण्याइतके साधन नव्हते.
खरीप हंगामाची कामे सुरू असल्याने पर्याय नसलेल्या गायकवाड यांनी पत्नी हौसाबाई यांनाच बैलाच्या जागी जूंपून नांगरणीची कामे सुरू ठेवली. या घटनेचे छायाचित्र आणि व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. एका महिलेला बैलाच्या जागी जुंपून शेतीची कामे करावी लागत असल्याचे दृश्य पाहून राज्यभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली.
मुख्यमंत्री सचिवालयाची तातडीची हालचाल
या घटनेची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी तातडीने मुख्यमंत्री सचिवालयाला आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले. त्यानंतर लातूर जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, कृषी आणि पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी समन्वय साधत मदतकार्याला वेग दिला.
प्रशासनाने परिस्थितीची पाहणी करून नव्या बैलाची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून योग्य बैलाची निवड करून तो गायकवाड कुटुंबाला देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात आली.
काही तासांत मिळाला नवा आधार
जिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नवीन बैल गायकवाड कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आला. बैल मिळाल्यानंतर कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. पत्नीला बैलाच्या जागी जूंपण्याची वेळ आता पुन्हा येणार नसल्याने कुटुंबावरील मोठा मानसिक ताणही दूर झाला आहे.
स्थानिक ग्रामस्थांनीही प्रशासनाच्या तातडीच्या प्रतिसादाचे स्वागत केले. सामाजिक माध्यमांवर चर्चेत आलेल्या या प्रकरणात शासनाने त्वरित निर्णय घेतल्याने गरजू कुटुंबाला योग्य वेळी मदत मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
नुकसानभरपाईलाही मंजुरी
नैसर्गिक आपत्तीमुळे जनावरांचा मृत्यू झाल्यास राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे. त्यानुसार दगावलेल्या बैलाचा पंचनामा करून आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर नुकसानभरपाईची रक्कम मंजूर करण्यात आली असून ती थेट गायकवाड यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
‘आता नव्याने उभे राहू’
या मदतीबद्दल भावना व्यक्त करताना हौसाबाई गायकवाड म्हणाल्या, “एका बैलाचा मृत्यू झाल्यानंतर आमच्यासमोर मोठे संकट उभे राहिले होते. शेतीची कामे थांबवणे शक्य नव्हते. त्यामुळे परिस्थितीमुळे कठोर निर्णय घ्यावा लागला. मात्र शासन आणि प्रशासनाने आमच्या अडचणीची दखल घेत तातडीने मदत केली. नवीन बैल मिळाल्याने खरीप हंगामातील कामांची चिंता दूर झाली आहे. आता आम्ही पुन्हा नव्या उमेदीने कामाला सुरुवात करू.”
एका बैलाच्या मदतीपुरती मर्यादित नसलेली ही मदत गायकवाड कुटुंबासाठी उपजीविकेचा नवा आधार ठरली आहे. सामाजिक माध्यमांवरून समोर आलेल्या एका ग्रामीण वास्तवाची शासनाने घेतलेली दखल आणि त्यातून मिळालेला दिलासा, यामुळे प्रशासनाच्या तत्परतेचीही चर्चा होत आहे.


