ठाणे प्रतिनिधी
मुंबई : वाढदिवसाच्या आनंदावर विरजण घालणारी धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. वाढदिवसाच्या केकवरील सजावटीत वापरण्यात आलेल्या दोन धातूच्या पिना तीन वर्षीय मुलाने नकळत गिळल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. सुदैवाने ४८ तासांनंतर या पिना नैसर्गिकरीत्या शरीराबाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला.
ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट परिसरात राहणाऱ्या जीवशास्त्र शिक्षिका स्नेहा शेलार यांनी सोशल मीडियावर हा अनुभव मांडला आहे. ३१ मे रोजी मुलगा रेयांशचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंबाने विशेष पार्टीचे आयोजन केले होते. त्यासाठी बॉलिंग ॲलीच्या आकाराचा आकर्षक केक मागवण्यात आला होता.
पार्टी आनंदात पार पडली. मात्र दुसऱ्या दिवशी काही मोठ्या मुलांच्या निदर्शनास केकवरील चॉकलेट सजावटीमध्ये धातूच्या तारा आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. रेयांशनेही अशा दोन पिना गिळल्या असाव्यात, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर मुलाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.
एक्स-रे तपासणीत मुलाच्या लहान आतड्यात दोन धातूच्या पिना अडकल्या असल्याचे स्पष्ट झाले. ज्युपिटर रुग्णालयातील डॉक्टरांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शस्त्रक्रिया टाळण्याचा निर्णय घेतला. पिना आधीच आतड्यांपर्यंत पोहोचल्याने त्या नैसर्गिकरीत्या शरीराबाहेर पडण्याची प्रतीक्षा करण्याचा सल्ला देण्यात आला.
सुमारे ४८ तासांच्या प्रतीक्षेनंतर दोन्ही पिना सुरक्षितपणे शरीराबाहेर पडल्या आणि मुलाची प्रकृती स्थिर झाली. या काळात कुटुंबीयांना मोठ्या मानसिक तणावाचा सामना करावा लागल्याचे शेलार यांनी नमूद केले आहे.
शेलार यांच्या आरोपानुसार, केकवरील चॉकलेट बॉलिंग पिन्स उभ्या राहाव्यात यासाठी त्यांच्या आत धातूच्या तारांचा वापर करण्यात आला होता. केक लहान मुलासाठी असल्याची माहिती बेकरीला देण्यात आली होती. मात्र अशा धातूच्या साहित्याचा वापर केल्याची कोणतीही सूचना ग्राहकांना देण्यात आली नव्हती.
या घटनेनंतर शेलार यांनी पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. केक किंवा खाद्यपदार्थांवरील सजावटीमध्ये धातूचे तुकडे किंवा इतर साहित्य वापरण्यात आले आहे का, तसेच सजावटीचे सर्व भाग खाण्यायोग्य आहेत का, याची खात्री करून घ्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कुटुंबीयांनी कासारवडवली पोलिसांकडे तक्रार केली. मात्र हा विषय अन्न व औषध प्रशासनाच्या अखत्यारीत येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. केक किंवा धातूच्या पिनांचा नमुना उपलब्ध नसल्याने चौकशी करणे कठीण असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र ग्राहक परिषदेचे शिरीष देशपांडे यांनी सांगितले की, ग्राहक संरक्षण कायदा २०१९ अंतर्गत दोषपूर्ण उत्पादनांमुळे किंवा आवश्यक इशारे न दिल्यामुळे झालेल्या हानीबाबत उत्पादक व विक्रेते जबाबदार धरले जाऊ शकतात. त्यामुळे संबंधित कुटुंबाला ग्राहक न्यायालयात भरपाईची मागणी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.


