ठाणे प्रतिनिधी
ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाबाहेर एका वृद्ध व्यक्तीला कथितपणे मारहाण झाल्याच्या घटनेने शहरात संतापाची लाट उसळली आहे. किरकोळ वादातून एका ओला कॅब चालकाने वृद्ध व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप असून, या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
ठाण्यातील वर्तकनगर परिसरात स्वच्छता राखण्याच्या कारणावरून एका परप्रांतीय टॅक्सीचालकाने ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली.
मा. श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार #मनसे नेते अविनाश जाधव यांनी घटनास्थळी जाऊन परिसरातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांना समज दिली! pic.twitter.com/PnJww5nER7
— Manse Speaks (@ManseSpeaks) June 10, 2026
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी ज्युपिटर रुग्णालय परिसरात हा प्रकार घडला. वाद वाढल्यानंतर चालकाने वृद्ध व्यक्तीला मारहाण केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. या घटनेनंतर विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. संबंधित आरोपीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच प्रकरणाचा सखोल तपास करून आवश्यक ती सर्व कायदेशीर पावले उचलण्याचे निर्देशही देण्यात आल्याचे सांगितले जाते.
या घटनेनंतर मनसेकडून आंदोलन करण्यात आले. मनसे नेते अविनाश जाधव यांनी घटनेचा निषेध करत सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातील चालकांसाठी मराठी भाषेच्या सक्तीच्या अंमलबजावणीची मागणी पुन्हा एकदा पुढे आणली.
पोलिसांकडून आरोपी चालकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली असली, तरी मारहाण झालेल्या वृद्ध व्यक्तीने अद्याप अधिकृत तक्रार नोंदवलेली नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके नियुक्त केली असून, पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, सार्वजनिक ठिकाणी वाढत्या आक्रमकतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


