सातारा प्रतिनिधी
शहरातील राजवाडा परिसरात उन्हाळ्याच्या हंगामात फळ विक्रीचा व्यवसाय तेजीत असताना प्रशासनाच्या नियोजनातील विसंगती आणि अंमलबजावणीतील ढिलाईचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. लाखो रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेले फ्रूट मार्केट उपलब्ध असतानाही अनेक मोठे फळ विक्रेते तेथे स्थलांतर करण्यास टाळाटाळ करत रस्त्यांवरच व्यवसाय करत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि पादचाऱ्यांची गैरसोय वाढत असताना डोंगरदऱ्यांतून रानमेवा गोळा करून शहरात विक्रीसाठी येणाऱ्या गोरगरीब विक्रेत्यांना मात्र निश्चित जागेअभावी हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
मोती चौक ते राजवाडा या परिसरात अनेक वर्षांपासून फळ विक्रेत्यांनी फूटपाथ आणि रस्त्यांच्या कडेला व्यवसाय थाटल्याचे चित्र कायम आहे. शहरातील फळ विक्रेत्यांसाठी स्वतंत्र फ्रूट मार्केटची सुविधा निर्माण करण्यात आली असली तरी अनेक व्यापाऱ्यांनी तेथे जाण्याऐवजी मुख्य रस्त्यांवरच व्यवसाय सुरू ठेवला आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीदरम्यान अडचणींचा सामना करावा लागत असून पादचाऱ्यांसाठी असलेले फूटपाथही व्यापले जात आहेत.
स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेकदा तक्रारी करूनही संबंधित प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. अतिक्रमणामुळे परिसरात स्वच्छतेचे प्रश्नही निर्माण होत असून बाजारपेठेतील शिस्तीचा अभाव प्रकर्षाने जाणवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, सातारा तालुक्यातील डोंगराळ भागातून गावठी आंबे, रायवळ आंबे, करवंदे, जांभळे तसेच इतर विविध प्रकारचा रानमेवा गोळा करून शहरात आणणाऱ्या विक्रेत्यांची परिस्थिती मात्र बिकट आहे. पहाटेपासून जंगल आणि डोंगरदऱ्यांतून मेहनत करून गोळा केलेला मेवा विकण्यासाठी शहरात येणाऱ्या या विक्रेत्यांना बसण्यासाठी सुरक्षित आणि निश्चित जागा उपलब्ध नसल्याने त्यांना उन्हात, धुळीत आणि असुरक्षित वातावरणात व्यवसाय करावा लागत आहे.
काही विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, प्रमुख चौकांमध्ये व्यवसाय करणाऱ्या प्रभावशाली व्यापाऱ्यांकडून त्यांना जागा सोडण्यास भाग पाडले जाते. विशेषतः मोती चौक आणि गोल बाग परिसरात अशा प्रकारच्या वादावादी वारंवार घडत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे रोजंदारीवर अवलंबून असलेल्या रानमेवा विक्रेत्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे.
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी रानमेवा विक्रेत्यांसाठी फ्रूट मार्केटमध्ये हंगामी स्वरूपात स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. या विक्रेत्यांना बाजारपेठेत स्थान मिळाल्यास ग्राहकांनाही दर्जेदार आणि स्थानिक उत्पादनांचा लाभ मिळेल, तसेच रस्त्यांवरील अतिक्रमणाचा प्रश्नही काही प्रमाणात सुटू शकेल, असे मत व्यक्त केले जात आहे.
फ्रूट मार्केटची सुविधा उपलब्ध असतानाही मोठे व्यापारी रस्त्यांवर व्यवसाय करत असतील आणि प्रत्यक्ष गरजू विक्रेत्यांना जागा मिळत नसेल, तर बाजार व्यवस्थापनाच्या उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याची टीका होत आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांवर कठोर कारवाई करताना रानमेवा विक्रेत्यांसाठी न्याय्य आणि शाश्वत व्यवस्था उभारण्याची गरज असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने पाहते, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.


