सातारा प्रतिनिधी
देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत संवाद साधण्याची आणि सहभोजन करण्याची संधी हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरतो. सातारा जिल्ह्यातील काशीळ येथील सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) जवान अस्मिता दीपक जाधव हिला नुकताच असा अभिमानास्पद अनुभव आला. भारत-बांगलादेश सीमेवरील त्रिपुरा दौऱ्यात अमित शाह यांनी बीएसएफ जवानांशी साधलेल्या संवादादरम्यान महाराष्ट्राशी असलेल्या आपल्या नात्याचा उल्लेख करत अस्मिताशी केलेल्या आत्मीय संवादाची सध्या चर्चा रंगली आहे.
उच्च शिक्षण पूर्ण करून देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगत अस्मिता जाधव हिने बीएसएफमध्ये प्रवेश केला. सध्या ती त्रिपुरा सीमावर्ती भागात कार्यरत असून, केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान निवडक जवानांसोबत झालेल्या संवाद कार्यक्रमात तिचा समावेश होता. या वेळी शाह यांनी जवानांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या अनुभवांबाबत आणि सेवाकाळातील आव्हानांबाबत माहिती जाणून घेतली.
संवादादरम्यान अमित शाह यांनी अस्मिताला, “तुम कहाँ से हो?” असा प्रश्न विचारला. त्यावर अस्मिताने अभिमानाने “महाराष्ट्र, सातारा” असे उत्तर दिले. साताऱ्याचा उल्लेख होताच शाह यांच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. “कोल्हापूर मेरा ससुराल है और मेरा जन्म मुंबई में हुआ है,” असे सांगत त्यांनी महाराष्ट्राशी असलेले आपले जिव्हाळ्याचे नाते व्यक्त केले. या एका वाक्याने औपचारिक वातावरणातही आपुलकीचा सूर निर्माण झाला.
यानंतर महाराष्ट्रातील शेती, पिकांची परंपरा आणि खाद्यसंस्कृतीवरही चर्चा रंगली. महाराष्ट्रात कोणती पिके घेतली जातात, याबाबत विचारणा करताना शाह यांनी ज्वारी, बाजरी आणि गव्हाचा उल्लेख केला. “सातारा में ज्वार होता है क्या?” असा प्रश्न त्यांनी अस्मिताला विचारला. त्यावर “हाँ, हम ज्वार की रोटी खाते हैं,” असे उत्तर अस्मिताने दिले. या संवादातून महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनशैली आणि खाद्यपरंपरेबाबत शाह यांना असलेली माहिती आणि आत्मीयता प्रकर्षाने दिसून आली.
सहभोजनादरम्यान शाह यांनी अस्मिताच्या कुटुंबाची, तिच्या शैक्षणिक प्रवासाची तसेच बीएसएफमधील सेवाकाळाचीही सविस्तर विचारपूस केली. सीमावर्ती भागात प्रतिकूल परिस्थितीत देशसेवा करणाऱ्या जवानांच्या योगदानाचे कौतुक करत त्यांनी त्यांच्या कार्याला सलाम केला. जवानांच्या समस्या, गरजा आणि सेवाविषयक अनुभव जाणून घेण्यावरही त्यांनी भर दिला.
दरम्यान, सातारा जिल्ह्यातील एका युवतीला देशाच्या गृहमंत्र्यांसोबत प्रत्यक्ष संवाद साधण्याची आणि सहभोजन करण्याची संधी मिळाल्याने काशीळ परिसरात आनंदाचे वातावरण आहे. अस्मिताच्या या अनुभवामुळे तिच्या कुटुंबीयांसह गावकऱ्यांमध्येही अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. सीमारेषेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या कार्याला मिळालेली ही दखल आणि महाराष्ट्राशी जोडलेला संवादाचा धागा यामुळे त्रिपुरातील हा प्रसंग विशेष चर्चेचा विषय ठरला आहे.


