मुंबई प्रतिनिधी
राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच धडाकेबाज सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी मोठी कारवाई करत भ्रामक जाहिराती आणि संशयास्पद दावे करणाऱ्या आयुर्वेदिक औषध उत्पादकांना जोरदार दणका दिला आहे. योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली समूहाशी संबंधित दिव्य फार्मसी कंपनीच्या औषधांवर राज्यभरात एकाचवेळी धाडसत्र राबवत तब्बल ७३ लाख २४ हजार ६५६ रुपयांचा औषधसाठा जप्त करण्यात आला आहे.
एफडीएने नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, कोकण, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागांतील १२ आयुर्वेदिक औषध विक्रेत्यांवर कारवाई केली. औषधांबाबत गंभीर आजारांवर हमखास उपचार, चमत्कारिक परिणाम किंवा रोगमुक्तीचे दावे करणाऱ्या जाहिरातींच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्यानंतर ही व्यापक मोहीम हाती घेण्यात आली.
पदभार स्वीकारताच दिला होता इशारा
२५ मे रोजी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा दिला होता. भ्रामक आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती तसेच अवैध औषधनिर्मिती व विक्रीविरोधातील कारवाई अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण राहील, असे त्यांनी जाहीर केले होते.
या इशाऱ्यानंतर अवघ्या काही दिवसांत राज्यातील सात विभागांमध्ये समन्वय साधून एफडीएच्या अधिकाऱ्यांनी अभूतपूर्व धडक मोहीम राबवली. या मोहिमेत औषधे व जादूटोणादी (आक्षेपार्ह जाहिराती) अधिनियम १९५४ तसेच औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० मधील तरतुदींच्या उल्लंघनाची प्राथमिक नोंद झाल्याचे समोर आले.
गंभीर आजारांवरील ‘हमीशीर उपचार’ दाव्यांवर कारवाई
एफडीएच्या तपासात बाजारात उपलब्ध असलेल्या काही आयुर्वेदिक औषधांच्या प्रचारात मधुमेह, उच्च रक्तदाब, सांधेदुखी, स्थूलता, त्वचारोग आणि इतर गंभीर आजारांवर हमखास उपचार किंवा चमत्कारिक परिणाम होत असल्याचे दावे करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. कायद्याने प्रतिबंधित असलेल्या अशा जाहिरातींमुळे नागरिकांची दिशाभूल होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
यामुळे राज्यभरातील औषध निरीक्षकांनी विविध औषध विक्री केंद्रांवर छापे टाकून संबंधित औषधसाठा जप्त केला. या कारवाईमुळे आयुर्वेदिक औषध क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
कुठे किती औषधसाठा जप्त?
हरिद्वार (उत्तराखंड) येथील दिव्य फार्मसी कंपनीच्या औषधांवर ही कारवाई करण्यात आली. विभागनिहाय जप्त करण्यात आलेल्या साठ्याची किंमत पुढीलप्रमाणे –
– नागपूर विभाग – ₹७.२६ लाख
– नाशिक विभाग – ₹७.१० लाख
– पुणे विभाग – ₹१४.६८ लाख
– मुंबई विभाग – ₹१.८५ लाख
– कोकण विभाग – ₹१८.५८ लाख
– अमरावती विभाग – ₹१.४२ लाख
– छत्रपती संभाजीनगर विभाग – ₹०.४८ लाख
– अतिरिक्त पुणे विभागीय कारवाई – ₹२१.८३ लाख
एकूण जप्तीची किंमत ₹७३.२४ लाखांहून अधिक असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
“यापुढे थेट न्यायालयीन कारवाई”
या कारवाईनंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितले की, औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० तसेच संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढे केवळ प्रशासकीय कारवाई न करता थेट न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
“सुरक्षित अन्न आणि औषधे मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. हा अधिकार सुनिश्चित करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. जनतेच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणालाही यापुढे माफी दिली जाणार नाही,” असे मुंढे यांनी ठामपणे सांगितले.
औषध क्षेत्राला स्पष्ट संदेश
एफडीएच्या या कारवाईमुळे भ्रामक जाहिरातींच्या जोरावर व्यवसाय करणाऱ्या औषध उत्पादक आणि विक्रेत्यांना स्पष्ट संदेश मिळाला आहे. राज्यात आरोग्यविषयक दावे करणाऱ्या उत्पादनांवर आता अधिक कठोर नजर ठेवली जाणार असून, ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या कोणत्याही प्रकाराला प्रशासनाकडून आळा घालण्यात येणार असल्याचे संकेत या मोहिमेतून मिळाले आहेत.
तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एफडीएने सुरू केलेल्या या धडक मोहिमेमुळे औषध क्षेत्रातील नियमभंग करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, आगामी काळात अशा कारवायांचा वेग आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


