रणजित मस्के,प्रतिनिधी
मुंबईत गेल्या २५ वर्षांपासून कोणतीही वैध कागदपत्रे नसताना आणि व्हिसाची मुदत संपल्यानंतरही बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या केनियाच्या एका ६१ वर्षीय नागरिकाला वाकोला पोलिसांनी अटक केली आहे. ओसिनो अँथोनी ओमांडी असे या विदेशी नागरिकाचे नाव आहे. या कारवाईमुळे शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नेमकी घटना काय?
वाकोला पोलीस ठाण्याच्या दहशतवाद विरोधी पथकाला (ATC) एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, सांताक्रूझ पूर्व येथील बिस्मिल्ला सैदी चाळ, वाकोला मज्जिद नेहरू रोड परिसरात एक परदेशी नागरिक संशयास्पद रित्या राहत आहे. या माहितीच्या आधारे वाकोला पोलिसांनी २९ मे २०२६ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला.
व्हिसा २००० मध्येच संपला
पोलिसांनी ओसिनो अँथोनी ओमांडी याची कसून चौकशी केली असता, तो मूळचा केनियाचा नागरिक असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याच्या पासपोर्ट आणि व्हिसाची तपासणी केली असता, त्याचा व्हिसा सन २००० मध्येच संपल्याचे निष्पन्न झाले. गेल्या २५ वर्षांपासून तो कोणतीही अधिकृत परवानगी नसताना भारतात अवैधरीत्या वास्तव्यास होता. पोलिसांनी त्याच्याकडून केनियाच्या नागरिकत्वाचे पुरावे आणि पासपोर्ट हस्तगत केला आहे. सध्या या इसमाला हद्दपार करण्याची प्रक्रिया पोलीस उपायुक्त, विशेष शाखा-२, गुन्हे अन्वेषण विभाग, मुंबई यांच्यामार्फत सुरू करण्यात आली आहे.
मोहीम राबवणारे अधिकारी व कर्मचारी
ही यशस्वी कारवाई अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, मुंबई, पोलीस उपायुक्त, परिमंडळ ८, मुंबई, सहाय्यक पोलीस आयुक्त, वाकोला विभाग आणि वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) खराडे आणि वाकोला पोलीस ठाण्याच्या दहशतवाद विरोधी पथकातील सर्व पोलीस अधिकारी व पोलीस हवालदार यांनी केली आहे.


