सातारा प्रतिनिधी
महाबळेश्वर : महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील दुर्गम आंबेनळी घाटात भीषण अपघात होऊन स्कॉर्पिओ गाडी तब्बल १,५०० ते १,८०० फूट खोल दरीत कोसळल्याने ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील १९ ते ३५ वयोगटातील तरुणांचा समावेश असून, त्यापैकी ७ जण जिवलग मित्र होते. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हा अपघात रविवारी पहाटेच्या सुमारास घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरी अत्यंत खोल आणि झाडीने व्यापलेली असल्याने जवळपास १८ तास या दुर्घटनेची माहिती कोणालाही मिळाली नाही. रात्रीपर्यंत तरुण घरी न परतल्याने नातेवाइकांनी पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर सुरू झालेल्या शोधमोहीमेत एका तरुणाचा मोबाईल सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी मोबाईलचे लोकेशन ट्रॅक केले असता ते पोलादपूर परिसरात दिसून आले. त्यावरून शोध घेत अखेर आंबेनळी घाटातील दरीत अपघातग्रस्त वाहन आढळले.
पोलिसांच्या माहितीनुसार, बागलगाव हद्दीतील वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असावा. संबंधित ठिकाणी संरक्षक कठडा नसल्याचेही समोर आले आहे. गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावरून थेट दरीत कोसळली.
घटनेची माहिती मिळताच प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स तसेच सह्याद्री ट्रेकर्सच्या स्वयंसेवकांना पाचारण करण्यात आले. दरीची खोली आणि अंधारामुळे रविवारी रात्री बचावकार्य थांबवावे लागले. सोमवारी सकाळी ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्याने शोधमोहीम राबवण्यात आली. मृतदेह दरीत वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले असल्याने बचाव पथकाला मोठी कसरत करावी लागली.
जवळपास २४ तास सुरू असलेल्या या थरारक रेस्क्यू ऑपरेशननंतर सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेमुळे सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांवर शोककळा पसरली असून, घाटरस्त्यांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


