पुणे प्रतिनिधी
पिंपरी : चिंचवडमधील मदर तेरेसा उड्डाणपुलावरील एम्पायर इस्टेट बीआरटी बसथांब्यावर कंपनीच्या बसची वाट पाहत उभ्या असलेल्या २४ वर्षीय तरुणीसमोर अश्लील कृत्य करणाऱ्या आरोपीला पिंपरी पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत अटक केली. झाकीर शेख (वय ४३, रा. चिंचवडे नगर, वाल्हेकरवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो एका मॉलमध्ये बाऊन्सर म्हणून काम करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
ही घटना बुधवारी (दि. २१) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. संबंधित तरुणी कामावर जाण्यासाठी एम्पायर इस्टेट परिसरातील बीआरटी बसथांब्यावर थांबली होती. त्यावेळी बसथांब्यावर आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने तिच्यासमोर बसून अश्लील वर्तन सुरू केले. हा प्रकार लक्षात येताच तरुणी घाबरली; मात्र तिने धाडस दाखवत संबंधिताला जाब विचारला आणि मोबाईलमध्ये संपूर्ण प्रकाराचे चित्रीकरण सुरू केले. आपले चित्रीकरण होत असल्याचे लक्षात येताच आरोपी तेथून पसार झाला.
दरम्यान, फिर्यादीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील तब्बल ६० ते ७० सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपीने ओळख लपवण्यासाठी कपडे बदलल्याचे समोर आले. तरीही पोलिसांनी शूज आणि टी-शर्टच्या रंगाच्या आधारे तपास करत आरोपीचा माग काढला आणि त्याला चिंचवडे नगर परिसरातून ताब्यात घेतले. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


