स्वप्नील गाडे,प्रतिनिधी
मुंबई : कोलकात्यातील शिबपूर परिसरात झालेल्या बॉम्बस्फोट आणि अंधाधुंद गोळीबार प्रकरणातील तीन मुख्य आरोपींना मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-६ने देवनार परिसरातून अटक केली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे मोठे यश मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.
७ मे २०२६ रोजी शिबपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १०० ते १५० जणांच्या जमावाने हिंसक हल्ला करत बॉम्बफेक आणि गोळीबार केला होता. या घटनेत अनेक जण जखमी झाले होते. या प्रकरणी शिबपूर पोलीस ठाणे, हावडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान आरोपी मुंबईतील देवनार परिसरातील एकता एसआरए इमारतीत लपल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आठव्या मजल्यावरील फ्लॅटवर छापा टाकत शमीम अहमद अब्दुल रशीद (४०), जमील अख्तर अख्तर अली (४३) आणि आफताब अनवर खुर्शीद अनवर (४४) यांना ताब्यात घेतले.
चौकशीत तिघांचाही गुन्ह्यात सहभाग स्पष्ट झाल्यानंतर त्यांना पुढील कारवाईसाठी शिबपूर पोलीस ठाणे, हावडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपआयुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे आणि गुन्हे शाखेच्या युनिट-६च्या पथकाने केली.


