नाशिक प्रतिनिधी
राज्यात वाढत चाललेल्या विवाहाच्या समस्येचा गैरफायदा घेत लग्नाच्या नावाखाली तरुण आणि त्यांच्या कुटुंबांची आर्थिक लूट करणाऱ्या एका धक्कादायक टोळीचा नाशिकमध्ये पर्दाफाश झाला आहे. “वधू-वर सूचक केंद्र” चालवण्याच्या आडून तरुणांना विवाहाचे आमिष दाखवायचे, लाखो रुपये उकळायचे आणि लग्नानंतर काही दिवसांतच नवरीला पळवून नेत वरपक्षाची फसवणूक करायची, असा या टोळीचा थरारक मोडस ऑपरेंडी उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी चार महिलांसह अनेक आरोपींना अटक केली असून, या टोळीने राज्यातील विविध भागांमध्ये अनेकांना गंडा घातल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागातील अनेक तरुणांना विवाहासाठी वधू मिळण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. विशेषतः शेतकरी कुटुंबातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल तरुणांना याचा मोठा फटका बसत आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत काही टोळ्या विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली सक्रिय झाल्या आहेत. नाशिकमध्ये कार्यरत असलेल्या या टोळीने देखील अशाच पद्धतीने “विश्वासार्ह विवाह संस्था” असल्याचा बनाव करून अनेक कुटुंबांना जाळ्यात ओढले.
धुळे जिल्ह्यातील वैपूर येथील बळवंत पाटील यांच्या कुटुंबासोबत घडलेला प्रकार समोर आल्यानंतर या टोळीचे कारनामे उघड झाले. मार्च महिन्यात मोठ्या थाटामाटात लग्न लावून देण्यात आले. यासाठी दलालांनी वरपक्षाकडून तब्बल २ लाख ७० हजार रुपये उकळले. त्याशिवाय लग्न साहित्य आणि इतर खर्चाच्या नावाखाली आणखी हजारो रुपये घेतले गेले. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू असल्याचा आभास निर्माण करण्यात आला. मात्र लग्नानंतर काही दिवसांतच नवरीने घरात वाद घालण्यास सुरुवात केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित महिलेनं आत्महत्येच्या धमक्या देत कुटुंबावर मानसिक दबाव आणला आणि अचानक घर सोडून निघून गेली. धक्कादायक म्हणजे ती थेट दलालाच्या घरी जाऊन राहत असल्याचं उघड झालं. त्यामुळे वरपक्षाला संशय आला. अखेर आपली योजनाबद्ध फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर कुटुंबाने मुंबई नाका पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
तक्रार प्राप्त होताच मुंबई नाका पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला. या कारवाईत गीता कोसरे, संगीता मोरे, जयंश्री शिंगाडे आणि पुष्पा रामटेके या महिलांसह इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात या टोळीने अनेक विवाहांच्या माध्यमातून लाखो रुपयांची फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे या टोळीची कार्यपद्धती अत्यंत नियोजनबद्ध होती. आधी आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या किंवा लग्नासाठी प्रयत्नशील असलेल्या तरुणांची माहिती मिळवली जायची. त्यानंतर विश्वास संपादन करून लग्नाची बोलणी पुढे नेली जात. लग्नानंतर काही दिवसांतच नवरी घरातून गायब होत असे किंवा वाद निर्माण करून घर सोडत असे. त्यानंतर दलाल आणि संबंधित महिला संपर्क तोडत असल्याचं तपासात समोर आलं आहे.
या संपूर्ण कारवाईत मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांकडून आता या टोळीचे राज्यातील इतर जिल्ह्यांशी संबंध आहेत का, याचाही तपास सुरू आहे. तसेच आणखी काही पीडित पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, विवाह जुळवून देणाऱ्या एजंट, दलाल किंवा सूचक केंद्रांशी व्यवहार करताना नागरिकांनी अत्यंत सावध राहावे, कोणतीही आर्थिक देवाणघेवाण करण्यापूर्वी संबंधितांची सखोल चौकशी करावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


