सांगली प्रतिनिधी
मे महिन्याच्या मध्यावरच सांगली जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता जाणवू लागली असून आटपाडी तालुक्यातील पिंपरी खुर्द येथे जिल्ह्यातील पहिला शासकीय पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करण्यात आला आहे. वाढत्या उन्हाच्या झळा आणि घटलेल्या जलसाठ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना हाती घेतल्या असून तब्बल ४ कोटी ८० लाख ४८ हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करून त्यास मंजुरी देण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागू नये, यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने व्यापक नियोजन सुरू केले आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय येवले यांनी याबाबत माहिती दिली.
प्रशासनाच्या आराखड्यानुसार जिल्ह्यात आवश्यकतेनुसार एकूण ६६ पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर १२६ विहिरींचे अधिग्रहण तसेच नऊ विंधन विहिरी कार्यान्वित करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. पाणीटंचाई अधिक गंभीर होण्यापूर्वीच उपाययोजना राबवण्यावर प्रशासनाचा भर असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
सध्या आटपाडी तालुक्यातील पिंपरी खुर्द येथील चव्हाण वस्तीवर पहिला शासकीय टँकर सुरू करण्यात आला असून या भागातील नागरिकांना त्याचा दिलासा मिळत आहे. पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने गावातील पारंपरिक स्रोत कोरडे पडू लागले होते. त्यामुळे प्रशासनाने तातडीने टँकर सुरू करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, खानापूर आणि शिराळा तालुक्यांमध्येही पाणीटंचाईची स्थिती निर्माण होत आहे. खानापूर तालुक्यातील रेवणगाव आणि ऐनवाडी येथे प्रत्येकी दोन कूपनलिका अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. तर शिराळा तालुक्यातील बांबवडे येथे एक कूपनलिका, तसेच करमाळे येथे एक कूपनलिका आणि एक विहीर अधिग्रहित करण्यात आली आहे. अशा प्रकारे सध्या सात विहिरी आणि कूपनलिकांद्वारे पाच गावांना पाणीपुरवठा सुरू आहे.
ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी गावनिहाय परिस्थितीचा आढावा घेतला जात असून ज्या ठिकाणी मागणी वाढेल, त्या ठिकाणी तातडीने टँकर सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. विहिरींचे अधिग्रहण, कूपनलिका सुरू करणे आणि पर्यायी जलस्रोतांचा वापर या माध्यमातून उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात सांगली जिल्ह्यातील काही भागात पाणीटंचाई गंभीर रूप धारण करते. विशेषतः आटपाडी, खानापूर आणि जत परिसरात भूजल पातळी झपाट्याने खालावत असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहते. यंदाही पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याने उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच टंचाईची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे प्रशासनाने पूर्वतयारीला गती दिली असून पुढील काही आठवड्यांत टँकर आणि जलस्रोत अधिग्रहणाची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


