पुणे प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि निर्घृण हत्येप्रकरणी समोर आलेल्या पोस्टमार्टम अहवालाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. आधीच संतापाच्या ज्वाला धगधगत असताना, या अहवालातील तपशीलांनी समाजमनाला अक्षरशः हादरवून सोडले आहे.
ससून रुग्णालयाकडून सादर करण्यात आलेल्या प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार, आरोपीने चिमुकलीच्या तोंडात गोळा कोंबून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. एवढ्यावरच न थांबता, तिचा मृत्यू झाल्याची खात्री करण्यासाठी तिच्या छातीत जोरदार प्रहार केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या अमानुष कृत्यामुळे संतापाची लाट आणखी तीव्र झाली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील ६५ वर्षीय आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून न्यायालयाने त्याला ७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला पकडून चोप दिल्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केले होते.
नेमकं घडलं काय?
१ मे रोजी सुट्टीसाठी आजीच्या घरी आलेली चार वर्षांची चिमुकली घराच्या अंगणात खेळत होती. याचवेळी आरोपीने तिला फूस लावून गोठ्यात नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करून दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली. इतकंच नव्हे तर पुरावे लपवण्यासाठी तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेने गावासह संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
‘पॅरोलला नाही’ – सरकारचा कडक इशारा
या भीषण घटनेनंतर राज्य सरकारनेही कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल देऊ नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारच्या गुन्ह्यांतील तब्बल ८० ते ९० टक्के आरोपी पॅरोलवर बाहेर आल्यानंतर पुन्हा गुन्हे करतात. त्यामुळे या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी अधिक कठोर कायदेशीर चौकट उभारण्याचा निर्धार सरकारने व्यक्त केला आहे.
यापूर्वी २०१४ ते २०१९ दरम्यान अशा गुन्हेगारांना पॅरोल न देण्याचा कायदा अस्तित्वात होता. मात्र न्यायालयाने तो रद्द केल्यानंतर आता पुन्हा नव्या स्वरूपात कठोर कायदा आणण्याची तयारी सुरू आहे.
या घटनेने केवळ कायदा-सुव्यवस्थेचाच प्रश्न उपस्थित केला नाही, तर समाजाच्या संवेदनशीलतेवरही मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. चिमुकल्या जीवावर झालेल्या या क्रूर अत्याचाराला न्याय मिळावा, अशी एकमुखी मागणी राज्यभरातून होत आहे.


