पुणे प्रतिनिधी
प्रस्तावित पुरंदर येथील ‘छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’ प्रकल्पासाठी भूसंपादनाचा दर अखेर निश्चित करण्यात आला असून, शेतकऱ्यांना प्रति एकर १ कोटी ६१ लाख १ हजार ९२५ रुपयांचा मोबदला दिला जाणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी मंगळवारी ही माहिती दिली. सहमतीने जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना अतिरिक्त १० टक्के प्रोत्साहनपर रक्कम तसेच कुटुंबातील एका सदस्याला रोजगार देण्याची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भूसंपादनाची आर्थिक प्रक्रिया ७ मेपासून सुरू होणार असून, करारनामा झाल्याच दिवशी आरटीजीएसद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर मोबदला जमा केला जाईल. ही प्रक्रिया १० जूनपर्यंत टप्प्याटप्प्याने राबवली जाणार आहे. त्यानंतर उर्वरित जमिनींचे संपादन कायदेशीर प्रक्रियेद्वारे करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी एकूण १,२१६ हेक्टर जमीन संपादित केली जाणार असून, सात गावांतील जमिनींची मोजणी पूर्ण झाली आहे. भूसंपादनाचा दर निश्चित करताना परिसरातील अलीकडील खरेदी-विक्री व्यवहारांचा सखोल अभ्यास करण्यात आल्याचे डूडी यांनी नमूद केले.
जमिनीव्यतिरिक्त विहिरी, बोअरवेल, निवासी घरे, शेड तसेच झाडे यांचे स्वतंत्र मूल्यांकन करून त्यावर दुप्पट मोबदला दिला जाणार आहे. विशेषतः आंबा, चिंच, सीताफळ यांसारख्या फळझाडांसाठी बाजारभावाच्या दुप्पट रकमेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे.
दरम्यान, प्रशासनाने भूसंपादन प्रक्रिया शक्य तितक्या पारदर्शक आणि वेळबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. मात्र, सक्तीच्या भूसंपादनाच्या पुढील टप्प्यावर शेतकऱ्यांचा प्रतिसाद आणि संभाव्य विरोध याकडेही लक्ष लागून आहे.


