मुंबई प्रतिनिधी
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या युवासेनेचे समन्वयक श्वेतांक तांबे (३०) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, मुंबईच्या राजकीय वर्तुळात आणि विशेषत: तरुण कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. उत्साही, सर्वसमावेशक आणि संपर्कक्षम नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या तांबे यांच्या आकस्मिक निधनामुळे युवासेनेच्या संघटनात्मक पातळीवर मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

काही दिवसांपूर्वीच आपला वाढदिवस मित्रपरिवार आणि कुटुंबीयांसमवेत उत्साहात साजरा करणारा हा हसतमुख चेहरा इतक्या अचानकपणे निघून जाईल, याची कल्पनाही सहकाऱ्यांना नव्हती. तांबे यांची कार्यपद्धती, मोकळेपणाने संवाद साधण्याची शैली आणि कार्यकर्त्यांना जोडून ठेवण्याची हातोटी यामुळे ते परिसरात विशेष लोकप्रिय होते. ‘राजकारण हे केवळ पदापुरते मर्यादित नसून, नातेसंबंध जपण्याची जबाबदारी आहे,’ या भूमिकेतून त्यांनी काम केल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले.

युवासेनेच्या माध्यमातून वांद्रे पूर्व भागात त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले. स्थानिक तरुणांना संघटित करणे, नागरिकांच्या तक्रारी तत्परतेने सोडवणे आणि पक्षाच्या धोरणांचा प्रसार करणे या कामांत ते पुढाकार घेत असत. त्यांच्या संवादकौशल्यामुळे आणि सहज वागणुकीमुळे ते केवळ स्वतःच्या पक्षातच नव्हे, तर इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्येही परिचित आणि आपुलकीचे व्यक्तिमत्त्व बनले होते.

दरम्यान, त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर शोकसंदेशांचा अक्षरशः पूर आला. “कालपर्यंत फेसबुक लाइव्हवर बोलणारा मित्र आज आपल्यात नाही,” अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. ‘हसरा, दिलखुलास आणि कायम आनंदात राहणारा मित्र’ अशी त्यांची प्रतिमा अनेकांनी आपल्या आठवणीतून मांडली.

युवासेना नेते जय सरपोतदार यांनी भावनिक शब्दांत श्रद्धांजली अर्पण करताना, “अशी वेळ येईल असे कधी वाटले नव्हते. एक निष्ठावंत शिवसैनिक आणि जिवलग मित्र गमावला,” असे म्हटले. ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनीही “तुझा मोकळा स्वभाव आणि हसरा चेहरा कायम स्मरणात राहील,” अशा शब्दांत शोक व्यक्त केला. विविध पक्षांतील नेते व कार्यकर्त्यांनीही तांबे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत त्यांच्या सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख केला.

तांबे यांच्या पश्चात आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, ते अजूनही धक्क्यात आहेत. काही दिवसांपूर्वी आईसोबतचा ‘मूव्ही डेट’चा फोटो त्यांनी सामाजिक माध्यमांवर शेअर केला होता; तोच आता अनेकांच्या स्मरणात राहिलेला एक हळवा क्षण ठरत आहे.
दरम्यान, तांबे यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप स्पष्ट कारण समोर आलेले नसून निर्मल नगर पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

तरुण वयात उमेदीने काम करणारा, लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध जपणारा आणि सकारात्मक ऊर्जा देणारा चेहरा काळाने हिरावून नेल्याची भावना त्यांच्या सहकाऱ्यांत व्यक्त होत आहे. श्वेतांक तांबे यांचे अकाली निधन हे केवळ एका कार्यकर्त्याचे जाणे नसून, एका उर्जावान पिढीच्या आकांक्षांना बसलेला धक्का असल्याचे मानले जात आहे.


