मुंबई प्रतिनिधी
मुंबई: नाशिकमधील एका नामांकित कंपनीतील धक्कादायक प्रकार ताजा असतानाच आता मुंबईतही ‘कॉर्पोरेट जिहाद’चा प्रकार समोर आला आहे. एका खासगी कंपनीत टेलिकॉलर म्हणून काम करणाऱ्या तरुणीला अश्लील मेसेज पाठवून शारीरिक संबंधांची मागणी करणाऱ्या आरोपीला आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली आहे. अश्रफ सिद्दिकी असे या आरोपीचे नाव असून तो एका राजकीय नेत्याचा नातेवाईक असल्याची माहिती समोर येत आहे.
मुलाखतीसाठी आलेल्या मुलींचे क्रमांक मिळवले
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अश्रफ आणि पीडित तरुणी मुंबईतील एका मोठ्या खासगी कंपनीत टेलिकॉलर म्हणून कार्यरत होते. २१ ते २३ एप्रिल २०२६ या काळात आरोपीने आपल्या पदाचा गैरवापर केला. नोकरीसाठी मुलाखतीला येणाऱ्या तरुणींचे मोबाईल क्रमांक त्याने डेटाबेसमधून मिळवले आणि त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्याने केवळ पीडितेचाच नाही तर इतर ३ ते ४ मुलींनाही अशाच प्रकारे लक्ष्य केल्याचे तपासात उघड झाले आहे.
‘हिंदू मुलीच आवडतात’ म्हणत मानसिक छळ
आरोपीने पीडित तरुणीला व्हॉट्सअॅपवर अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवून मानसिक छळ केला. त्याने तिला सातत्याने फोन करून शरीरसुखाची मागणी केली. धक्कादायक बाब म्हणजे मेसेजमध्ये ‘मला हिंदू मुलीच आवडतात’ असे चिथावणीखोर विधान करून त्याने पीडितेवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर पीडितेचा पाठलाग करून तिला असुरक्षित वाटेल असे कृत्यही त्याने केले.
पोलिसांची तात्काळ कारवाई
या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने हिंमत दाखवत आग्रीपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास चक्रे फिरवून अश्रफला अटक केली. त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३५४ सह इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजकीय क्षेत्रातून उमटल्या तीव्र प्रतिक्रिया
या घटनेनंतर मुंबईत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. अशा विकृत मानसिकतेच्या लोकांवर कठोरातील कठोर कारवाई व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केली. तसेच कोणत्याही दडपणाला बळी न पडता तरुणींनी अशा प्रकारांविरोधात तक्रार करण्यासाठी पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. या प्रकरणात आरोपीने अजून किती मुलींना अशा प्रकारे जाळ्यात ओढले आहे याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.


