नवी मुंबई प्रतिनिधी
‘कानून के हात लंबे होते’ असा डॉयलॉग नेहमी आपण हिंदी सिनेमात ऐकत असतो, पण, आता नवी मुंबईमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. एका महिलेचा खून करून पळून गेलेल्या आरोपीला पोलिसांनी दुसऱ्या देशात जाऊन अटक केली आहे.
शरीरसुखाची मागणीला नकार दिला म्हणून या नराधमाने महिलेची हत्या केली होती. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी अखेरीस आरोपीला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील तुर्भे गावात ही घटना घडली होती. तुर्भेमध्ये 50 वर्षीय मर्जीना मंडल हत्या प्रकरणाचा उलगडा करत एपीएमसी पोलिसांनी फरार आरोपीला थेट नेपाळमधून अटक केली आहे. १३ मार्च रोजी अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने वार करून मर्जीना मंडल यांची हत्या केली होती. या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आधी बिहार नंतर नेपाळ
तपासादरम्यान पोलिसांनी मयत महिलेच्या मोबाईल कॉल डिटेल्स तसंच परिसरातील नागरिकांची चौकशी केली. त्यात मोहम्मद अख्तर हा संशयित असल्याचे समोर आलं. घटनेनंतर त्याने मोबाईल बंद करून फरार झाल्याचंही उघड झालं होतं. आरोपी मूळ बिहारमधील किशनगंज येथील रहिवासी असल्याने पोलिसांनी बिहारमध्ये शोधमोहीम राबवली. मात्र तो तेथूनही पसार झाला होता. त्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी नेपाळमधील झापा जिल्ह्यातील बेलडांगी गावातून त्याला ताब्यात घेतलं.
४५० रुपयांसाठी महिलेला मारलं
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मर्जीना मंडल ही वेश्या व्यवसायासाठी महिला पुरवत होती. आरोपी मोहम्मद अख्तर हा तिच्याकडे गेला होता. त्याने 450 रुपये दिले, मात्र त्याला महिला उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यानंतर आरोपीने मयत महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. या मागणीस मर्जीना मंडलने नकार दिल्याने संतापलेल्या आरोपीने धारदार चाकूने वार करून तिची हत्या केली. तिची हत्या केल्यानंतर मोहम्मद अख्तर हा तुर्भेतून पळून गेला होता. अखेरीस पोलिसांनी या नराधमाला नेपाळमध्ये जाऊन ताब्यात घेतलं. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहे.


