
मुंबई:प्रतिनिधी
राज्यतील वाहन धारकांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. येत्या १ एप्रिलपासून राज्यातील वाहनधारकांना टोल टॅक्समध्ये अतिरिक्त रक्कम भरावी लागणार आहे. म्हणजेच सध्या असणाऱ्या रक्कमेत वाद होणार असल्याची माहिती एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
एनएचएआयचे प्रकल्प अधिकारी राकेश जावडे यांनी यासंदर्भात माहिती दिली. सध्या राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या वाहनांना विशेषत: कारसाठी (एकेरी वाहतूक) ७५ रुपये, टेम्पोसाठी ११५ रुपये, सहा टायर वाहनांसाठी २४५ तर दहा ते त्याहून अधिक टायरच्या वाहनांसाठी ३९५ रुपयांचा टोल टॅक्स भरावा लागतो. आता महामार्गांचा विस्तार, वाहनांची वाढलेली वर्दळ आणि देखभाल-दुरुस्तीवरील वाढता खर्च, या बाबींचा विचार करता १ एप्रिलपासून टोल टॅक्स पाच ते दहा रुपयांपर्यंत वाढू शकतो, असे जवादे यांनी सांगितले.
दरम्यान, टोल टॅक्स भरून प्रवास करणारे वाहन २४ तासात त्याच मार्गावरून परत आल्यास त्यांना पूर्वी भरलेल्या रकमेतील निम्मी रक्कम भरावीच लागते, अशी सद्य:स्थिती आहे. त्यानुसार कारसाठी (२४ तासात ये-जा करण्यासाठीचा टोल) ११० रुपये, टेम्पोसाठी १७५ ते १८० रुपये, सहा टायर ट्रकसाठी ३७० रुपये, १० व त्याहून अधिक टायरच्या वाहनांसाठी ५९० रुपयांचा टोल टॅक्स भरावा लागतो. आता तो टॅक्स १० रुपयांपर्यंत वाढेल.
केंद्र सरकारच्या वाहतूक विभागाकडून कोणत्या महामार्गांवरुन किती वाहने दररोज ये-जा करतात, त्या महामार्गाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी दरवर्षी किती खर्च करावा लागतो, आणखी काय उपाययोजना अपेक्षित आहेत, अशा विविध बाबींचा विचार करून व्होलसेल प्राइस इंडेक्स निश्चित केला जातो. त्यावरुन कोणत्या महामार्गांवर किती टोल टॅक्स वाढवायचा हे निश्चित होते. त्यानुसार १ एप्रिलपासून नवे दर लागू होतात, असेही अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.