पुणे प्रतिनिधी
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आमरसाची मागणी वाढत असतानाच पुणे जिल्ह्यात भेसळयुक्त मँगो पल्पचा मोठा साठा उघडकीस आल्याने नागरिकांच्या आरोग्याविषयी गंभीर चिंता निर्माण झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाने खेड आणि मावळ तालुक्यांमध्ये छापे टाकून तब्बल ३२ हजार किलो संशयित मँगो पल्प जप्त केला. सुमारे २.२३ लाख रुपयांचा हा मुद्देमाल असून नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
खेड तालुक्यातील राक्षेवाडी तसेच मावळ तालुक्यातील उरसे येथे ही कारवाई करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे उरसे येथील एका ठिकाणी छापा टाकण्यात आला असता, कोणत्याही वैध परवानगीशिवाय मँगो पल्प तयार केला जात असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे, पल्प तयार करताना साखरेऐवजी भेसळयुक्त घटक, दुधासदृश पदार्थ आणि कृत्रिम केशरी रंगाचा वापर होत असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले.
या कारवाईदरम्यान मँगो पल्पसह विविध कच्चा माल, द्रव्ये आणि रंगद्रव्ये जप्त करण्यात आली. संबंधित उत्पादन प्रक्रियेत स्वच्छतेचे निकष पाळले जात नसल्याचेही निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. सहआयुक्त दि. वा. भोगावडे आणि आयुक्त श्रीधर डुबे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली.
दरम्यान, कमी दरात उपलब्ध होणाऱ्या या पल्पचा ग्रामीण आणि निमशहरी भागात मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकाराची व्याप्ती अधिक असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
आरोग्यावर गंभीर परिणामांची भीती
भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या सेवनामुळे जुलाब, उलट्या, पोटदुखी यांसारख्या तात्काळ तक्रारी उद्भवू शकतात. दीर्घकालीन वापरामुळे शरीरावर दुष्परिणाम होण्याची, तसेच गंभीर आजारांचा धोका वाढण्याचीही शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
अन्न व औषध प्रशासनाने संबंधितांवर कठोर कारवाईचा इशारा दिला असून तपास सुरू आहे. नागरिकांनी स्वस्त दराच्या आणि अनोळखी स्त्रोतांमधून मिळणाऱ्या मँगो पल्पपासून दूर राहावे, तसेच प्रमाणित उत्पादनांनाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


