बुलढाणा प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात घडलेल्या एका थरकाप उडवणाऱ्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका वृषाली गावंडे यांच्या मृत्यूमागे अपघात नसून पूर्वनियोजित कट असल्याचे उघड होत असतानाच, या प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तपास (सीबीआय) कडे सोपवण्याची मागणी केली आहे.
यासोबतच, प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी आणि सरकारी बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी प्रख्यात वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशीही ठोस मागणी करण्यात आली आहे.
अपघात की घातपात? तपासात धक्कादायक वळण
२ मार्च २०२६ रोजी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास, संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील रहिवासी आणि पिंपळगाव काळे येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका वृषाली गावंडे या आपल्या दुचाकीने शाळेकडे जात होत्या. याचदरम्यान, पातुर्डा–कवठळ मार्गावर एका चारचाकी मालवाहू वाहनाने त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
प्रारंभी ही घटना अपघात म्हणूनच नोंदवण्यात आली. मात्र, घटनास्थळी त्यांच्या पती प्रकाश गावंडे यांची संशयास्पद उपस्थिती आणि माहेरच्या नातेवाईकांनी व्यक्त केलेल्या शंकेमुळे पोलिसांनी तपासाचा रोख बदलला.
सीसीटीव्ही आणि कॉल रेकॉर्डमधून उघड झाला कट
जळगाव जामोद पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल कॉल रेकॉर्ड तपासल्यानंतर संशयाची साखळी अधिक घट्ट झाली. पोलिसांनी वाहनचालक मंगेश सूर्यवंशी याला ताब्यात घेतले असता, चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली.
सूर्यवंशी याने कबूल केले की, वृषाली गावंडे यांचे पती प्रकाश गावंडे आणि त्यांचा मित्र मंगेश चहुळकर यांनी त्याला पैशांचे आमिष दाखवून अपघात घडवून आणण्यास प्रवृत्त केले. सुरुवातीला एक लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे सांगण्यात आले असून, संपूर्ण व्यवहार तीन लाखांपर्यंत पोहोचल्याचीही माहिती पुढे आली आहे.
स्वतःच्या पत्नीचाच जीव घेतला?
पोलिस तपासानुसार, प्रकाश गावंडे यांनी आपल्या मित्राच्या मदतीने हा संपूर्ण कट रचला. २ मार्चच्या सकाळी ठरवून ठेवलेल्या वेळेनुसार, मंगेश सूर्यवंशी याने टाटा पिकअप वाहनाने वृषाली यांच्या दुचाकीला धडक देत त्यांचा जीव घेतला. विशेष म्हणजे, अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित राहून प्रकाश गावंडे यांनी दुःखाचे नाटक केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणात पती, त्याचा मित्र आणि वाहनचालक अशा तिघांना अटक करण्यात आली आहे.
इतर आरोपींना अभय? संशय अधिक गडद
दरम्यान, या गुन्ह्यात इतर काही नातेवाईकांचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त होत असतानाही अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पोलिस तपासावरही प्रश्न उपस्थित होत असून, काही आरोपींना जाणूनबुजून अभय दिले जात आहे का, अशी चर्चा रंगू लागली आहे.
राजकीय पातळीवरून हस्तक्षेप
या सर्व घडामोडींमुळे प्रकरणाने आता राजकीय रंग घेतला आहे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या प्रकरणाचा तपास स्वतंत्र यंत्रणेकडे देण्याची मागणी केली आहे. “घटनेची गंभीरता लक्षात घेता, स्थानिक पोलिसांकडून निष्पक्ष तपास होईल याबाबत शंका आहे. त्यामुळे तपास सीबीआयकडे सोपवावा,” असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
न्यायाच्या प्रतीक्षेत कुटुंब, जनतेत संताप
वृषाली गावंडे यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांना न्याय मिळावा अशी मागणी जोर धरत आहे. शिक्षिका म्हणून समाजात आदराचे स्थान असलेल्या वृषाली यांच्या हत्येमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकरणाचा तपास आता कोणत्या दिशेने वळतो आणि सीबीआय चौकशीची मागणी मान्य होते का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


