सातारा प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सख्ख्या बहीण-भावाच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कॉलेजच्या कामानिमित्त घराबाहेर पडलेले हे दोघे पुन्हा घरी परतलेच नाहीत. तीन दिवसांच्या शोधानंतर त्यांचे पार्थिव सातारा जिल्ह्यातील नीरा उजव्या कालव्यात आढळून आले असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
मेखळी (ता. बारामती) येथील किरण काकासाहेब चोपडे (वय २६) आणि काजल काकासाहेब चोपडे (वय २३) अशी मृतांची नावे आहेत. काजल ही फलटणमधील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात तृतीय वर्षात शिक्षण घेत होती. प्रोजेक्टसंदर्भातील माहिती मिळवण्यासाठी ती आपल्या भावासोबत कॉलेजमध्ये गेली होती.
कॉलेजमधून बाहेर पडले… पण घरी पोहोचलेच नाहीत
मंगळवारी (७ एप्रिल) दुपारी दोघेही कॉलेजमधून बाहेर पडले. मात्र, सायंकाळपर्यंत घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. अखेर फलटण शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
तीन दिवसांनंतर कालव्यात सापडले पार्थिव
शोधमोहीम सुरू असतानाच माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी ते गुरसाळे हद्दीत नीरा उजव्या कालव्यात दोघांचे पार्थिव आढळून आले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने नातेपुते पोलिसांनी पार्थिव बाहेर काढले. पंचनामा करून शवविच्छेदनासाठी नातेपुते ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यानंतर पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
अपघात की घातपात? तपास सुरू
या घटनेमागे नेमके कारण काय, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. प्राथमिक तपासात दोघांच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळल्या नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांचे मोबाईल कालव्यात सापडले असून मोटरसायकलचा शोध सुरू आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, मोबाईलच्या सीडीआर अहवालानंतर या घटनेचा उलगडा होण्याची शक्यता आहे. मोटरसायकलसह कालव्यात पडल्याने अपघात झाला असावा, अशीही शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे.
परिसरात हळहळ, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर
एकाच कुटुंबातील दोन तरुण जीवांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. चोपडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक व ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त होत आहे.


