छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी
नशिबावर नव्हे तर कष्टांवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी यशाचे दरवाजे कसे उघडतात, याचा जिवंत प्रत्यय छत्रपती संभाजीनगरातील राज्य राखीव पोलीस बल (SRPF) मैदानावर पाहायला मिळाला. अकोल्याहून पोलीस भरतीसाठी आलेल्या नितीन चौरे या तरुणाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पायात साधी सँडल घालून ५ किलोमीटरची धाव अवघ्या १८ मिनिटांत पूर्ण केली. विशेष म्हणजे धावताना त्याच्या पायाची सालपट निघाली होती, तरीही त्याने हार मानली नाही.
नितीनची ही जिद्द आणि चिकाटी पाहून मैदानावरील वरिष्ठ अधिकारीही क्षणभर स्तब्ध झाले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून आलेल्या नितीनकडे सरावासाठी किंवा चाचणीसाठी योग्य बूट नव्हते. मात्र, खाकी वर्दीचे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवत त्याने सँडलवरच सराव सुरू ठेवला. प्रत्यक्ष चाचणीच्या दिवशीही त्याने परिस्थितीसमोर न झुकता त्याच सँडलवर धाव घेतली आणि अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
मैदानावर सँडल घालून धावणाऱ्या या जिद्दी तरुणावर एसआरपीएफ गट क्र. १४ चे समादेशक एसपी विक्रम साळी यांची नजर पडली. नितीनचा संघर्ष आणि त्याची धडपड पाहून साळी यांचे मन हेलावले. त्यांनी नितीनला तात्काळ बोलावून घेतले आणि त्याला नवीन बूटांची जोडी भेट दिली. केवळ शाबासकीपुरते न थांबता, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दाखवलेल्या या माणुसकीच्या कृतीमुळे नितीनच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ ‘SRPF Gr. 14’ च्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर पोस्ट होताच काही तासांतच तो प्रचंड व्हायरल झाला. आतापर्यंत ६० लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहत नितीनच्या जिद्दीला सलाम केला आहे. सोशल मीडियावर त्याच्या संघर्षाची आणि अधिकाऱ्यांच्या संवेदनशीलतेची मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे.
“माझ्याकडे बूट नव्हते म्हणून मी सँडलवरच धावलो. साळी साहेबांनी माझी जिद्द ओळखून मला बूट दिले. मी त्यांचा खूप आभारी आहे. आता अधिक मेहनत करून पोलीस होण्याचं माझं स्वप्न नक्की पूर्ण करेन,” अशा शब्दांत नितीन चौरेने आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, एका तरुणाची खाकी वर्दीसाठीची झुंज आणि एका अधिकाऱ्याने दाखवलेली माणुसकी यामुळे ही घटना केवळ प्रेरणादायी ठरली नसून, ‘जिद्द असेल तर अशक्य काहीच नाही’ हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.


