मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील महिलांच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या एका सिरीयल मोलेस्टरला बांगूर नगर पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत अटक करून महत्त्वाचे यश मिळवले आहे. रस्त्यावरून एकट्या जाणाऱ्या महिलांना लक्ष्य करून त्यांच्याशी अश्लील वर्तन करणाऱ्या या आरोपीमुळे गोरेगाव पश्चिम परिसरात काही दिवसांपासून भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण आणि विशेष पथकाच्या मदतीने आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास गोरेगाव पश्चिम येथील बांगूर नगर परिसरात एक तरुणी पायी घरी जात होती. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपीने अचानक चुकीच्या बाजूने येत तिच्या जवळ येऊन अश्लील प्रकार करत शरीराला अयोग्य पद्धतीने स्पर्श केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तरुणी घाबरून गेली. आरोपीने क्षणातच घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेनंतर पीडित महिलेने धाडस दाखवत बांगूर नगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. परिसरात अशा प्रकारच्या घटना यापूर्वीही घडल्याच्या चर्चेमुळे पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेत विशेष पथक तयार केले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळ व आसपासच्या परिसरातील तब्बल २९ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. आरोपीच्या हालचालींचा मागोवा घेत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले.
तपासादरम्यान मुन्नवर नासिर खान (वय २५) असे आरोपीचे नाव समोर आले. तो आरे कॉलनी परिसरात राहत असून फिल्मसिटीमध्ये काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
पोलिस तपासात आरोपी यापूर्वीही अशाच प्रकारच्या किमान चार छेडछाडीच्या घटनांमध्ये सहभागी असल्याचे उघड झाले आहे. महिलांना एकट्या पाहून त्यांच्या जवळ जाऊन अश्लील प्रकार करणे, शरीराला अयोग्य स्पर्श करणे आणि त्वरित पळ काढणे ही त्याची कार्यपद्धती असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध महिलेशी छेडछाड, अश्लील कृत्ये आणि संबंधित गुन्ह्यांबाबत भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरू असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, बांगूर नगर पोलिसांनी अल्पावधीत आरोपीला अटक केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी गस्त वाढवली असून नागरिकांनीही संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


