नाशिक प्रतिनिधी
नाशिक शहरात पुन्हा एकदा अत्यंत धक्कादायक आणि संवेदनशील प्रकरण उघडकीस आले असून सातपूर परिसरातील एका व्यावसायिकाशी संबंधित ब्लॅकमेलिंग प्रकरणाने आता मोठे आणि गंभीर वळण घेतले आहे. सुरुवातीला खंडणीसाठी केलेल्या ब्लॅकमेलिंगची तक्रार म्हणून समोर आलेल्या या प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत गेला, तसतसे धक्कादायक तपशील उघड होत गेले.
पोलिसांनी जप्त केलेल्या हार्डडिस्कमधून तब्बल १२१ महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याने नाशिक शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडिओंचा कालावधी २००३ ते २०२४ असा तब्बल २१ वर्षांचा असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणात विशेष बाब म्हणजे, ब्लॅकमेल करणारा व्यक्ती हा त्या व्यावसायिकाचा गेल्या १६ वर्षांपासून विश्वासू म्हणून काम करणारा ऑफिस बॉय असल्याचे उघड झाले आहे.
१६ वर्षांचा विश्वास ठरला घातक
सातपूर परिसरातील ६३ वर्षीय व्यावसायिकाने सातपूर पोलिस ठाण्यात खंडणीची तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, त्याच्याकडे दीर्घकाळापासून काम करणाऱ्या ऑफिस बॉयने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने कार्यालयातील हार्डडिस्क चोरी केली.
त्या हार्डडिस्कमध्ये व्यावसायिकाचे काही आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपींनी त्याचा गैरफायदा घेत व्यावसायिकाकडे मोठ्या रकमेची खंडणी मागण्यास सुरुवात केली. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी व्यावसायिकाला दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांचा सापळा आणि आरोपी जेरबंद
खंडणीची मागणी वाढत गेल्याने अखेर व्यावसायिकाने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर सातपूर पोलिसांनी सापळा रचून आरोपींना पकडण्याची योजना आखली.
आरोपींना पैसे देण्यासाठी दहावा मैल परिसरात बोलावण्यात आले. नियोजनाप्रमाणे पोलिसांनी चारही बाजूंनी घेराव घालत मुख्य आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन पेनड्राइव्ह आणि एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला.
यानंतर चौकशीदरम्यान या प्रकरणात आणखी तीन जणांचा सहभाग उघड झाला. पोलिसांनी आकाश बकरे, प्रकाश पानपाटील, सूरज गवई आणि श्रीपत शिंदे या संशयितांना ताब्यात घेतले आहे.
हार्डडिस्कमध्ये १२१ महिलांचे व्हिडिओ
या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे जप्त केलेल्या हार्डडिस्कची तपासणी करताना पोलिसांना १२१ महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ आढळून आले.
हे व्हिडिओ हँडिकॅम आणि मोबाईल फोनच्या सहाय्याने चित्रीत केले असावेत, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अनेक वर्षांच्या कालावधीत विविध महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड करून साठवले गेले असल्याने या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ब्युटीपार्लर आणि महिलांशी संपर्क
तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. संबंधित व्यावसायिक सातपूर परिसरात ब्युटीपार्लरही चालवत होता.
तसेच अंगणवाडी सेविका किंवा ब्युटीपार्लरमध्ये काम करणाऱ्या महिलांना रोजगार मिळवून देण्याच्या नावाखाली तो मदत करत असल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या महिलांशी त्याचा संपर्क कसा आला आणि त्या व्हिडिओंचे चित्रीकरण कशा परिस्थितीत झाले, याचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
लैंगिक शोषणाचा तपास
या व्हिडिओंमध्ये दिसणाऱ्या महिलांचे लैंगिक शोषण झाले आहे का, त्यांना धमकावून किंवा ब्लॅकमेल करून हे व्हिडिओ तयार करण्यात आले का, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलिस उपआयुक्त किशोर काळे यांनी सांगितले की, प्रकरण अत्यंत संवेदनशील असून प्रत्येक व्हिडिओची तपासणी केली जात आहे. व्हिडिओंमधील महिलांची ओळख पटवून त्यांच्याशी संपर्क साधण्याचे काम सुरू आहे.
विशेष पथक स्थापन करण्याची तयारी
या प्रकरणाचा तपास व्यापक स्वरूपाचा असल्याने पोलिस प्रशासनाने विशेष पथक स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. डिजिटल फॉरेन्सिक तपासणीद्वारे हार्डडिस्कमधील डेटा, त्याचे मूळ स्रोत आणि संबंधित व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
महिलांना पुढे येण्याचे आवाहन
या प्रकरणात जर कोणत्याही महिलेचे लैंगिक शोषण झाले असेल किंवा तिला धमकी देण्यात आली असेल, तर त्यांनी न घाबरता पुढे येऊन सातपूर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
आणखी मोठा रॅकेट उघड होण्याची शक्यता
दरम्यान, अलीकडेच राज्यात चर्चेत आलेल्या अशोक खरात प्रकरणानंतर आता नाशिकमधील हे प्रकरण समोर आल्याने समाजात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
तपास जसजसा पुढे जाईल, तसतसे या प्रकरणामागील आणखी धक्कादायक वास्तव समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात पोलिस तपासातून नेमके काय उघड होते, याकडे संपूर्ण नाशिकसह राज्याचे लक्ष लागले आहे.


