नाशिक प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात शुक्रवारी रात्री घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. स्नेहसंमेलन आटोपून घरी परतणाऱ्या इंदोरे येथील दरगोडे कुटुंबीयांची कार रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळल्याने सहा विद्यार्थ्यांसह एकूण नऊ जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक दुर्घटनेनंतर संपूर्ण दिंडोरी तालुक्यात शोककळा पसरली असून गावागावांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दरगोडे कुटुंबीय एका स्नेहसंमेलन कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रम आटोपून रात्री उशिरा ते कारने परतत असताना शिवाजीनगर परिसरात हा दुर्दैवी अपघात घडला. रस्त्याच्या कडेला असलेल्या उघड्या आणि संरक्षक भिंत नसलेल्या विहिरीजवळून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट विहिरीत कोसळली. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडल्याने मदतकार्य उशिरा सुरू झाले. स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले; मात्र तोपर्यंत कारमधील सर्व जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शनिवारी सकाळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, शिक्षण मंत्री दादा भुसे, खासदार भास्कर भगरे, माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, प्रांताधिकारी आप्पासाहेब शिंदे आणि तहसीलदार मुकेश कांबळे यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी पाहणी करून बचाव आणि तपास प्रक्रियेची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन मृतांच्या नातेवाईकांची भेट घेत सांत्वन केले. या प्रसंगी अनेक नातेवाईकांनी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करत अशा धोकादायक विहिरींवर संरक्षक उपाययोजना का करण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित केला.
यावेळी बोलताना आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले. शिवाजीनगर परिसरातील रस्त्यालगत असलेल्या या धोकादायक विहिरीबाबत योग्य ती सुरक्षात्मक उपाययोजना का करण्यात आली नाही, याचा तपास करण्यात येईल. तसेच विहीर मालक राजेंद्र राजे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. संबंधित विहीर तातडीने बुजविण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व धोकादायक विहिरींचा सर्वेक्षण करून अशा दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
याचवेळी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या प्रत्येकाच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली. शासनाकडून शक्य ती सर्व मदत दिली जाईल, असेही त्यांनी आश्वासन दिले.
दरम्यान, शनिवारी दुपारपर्यंत ग्रामीण रुग्णालयात सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. इंदोरे गावात या घटनेनंतर शोककळा पसरली असून गावात अत्यंत शोकाकुल वातावरणात मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाल्याने गावावर दुःखाचे सावट पसरले आहे. गावातील अनेक घरांतून रडण्याचा आक्रोश ऐकू येत होता. या घटनेने संपूर्ण दिंडोरी तालुका हादरला असून सर्व स्तरांतून तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये सुनील दत्तात्रेय दरगोडे (३२), त्यांची पत्नी रेशमा सुनील दरगोडे (२७), मुलगी राखी उर्फ गुणवंती (१०) तसेच पुतण्या माधुरी अनिल दरगोडे (१३) आणि श्रावणी अनिल दरगोडे (११) यांचा समावेश आहे. याशिवाय आशा अनिल दरगोडे (३२), त्यांचा मुलगा श्रेयश अनिल दरगोडे (११), मुलगी श्रुष्टी अनिल दरगोडे (१४) आणि पुतणी समृद्धी राजेश दरगोडे (७) यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.
दरम्यान, या दुर्घटनेमुळे रस्त्यालगत असलेल्या उघड्या विहिरी आणि पाणवठ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा धोकादायक विहिरींना संरक्षक भिंती, जाळी किंवा कुंपण नसल्याने अपघाताचा धोका कायम राहतो. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्हाभर सर्वेक्षण करून तत्काळ सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.


