सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्हा मधील फलटण येथे घडलेल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी न्यायालयीन घडामोड घडली आहे. या प्रकरणात अटकेत असलेले निलंबित पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने सुनावणीदरम्यान बदने यांना ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करत मोठा दिलासा दिला. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून कारागृहात असलेले बदने आता तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आत्महत्येने परिसरात खळबळ
ही घटना २३ ऑक्टोबर २०२५ रोजी घडली होती. फलटणमधील एका हॉटेलमध्ये एका महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती.
घटनास्थळी पोलिसांना एक महत्त्वाचा आणि धक्कादायक पुरावा मिळाला. संबंधित डॉक्टरने मृत्यूपूर्वी स्वतःच्या हातावर दोन व्यक्तींची नावे लिहिली होती. त्या नावांमध्ये PSI गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांचा समावेश होता.
महिला डॉक्टरने या दोघांकडून शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचा आरोप केल्याचेही तपासात समोर आले होते. या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत बदने आणि बनकर या दोघांना अटक केली होती.
जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव
अटकेनंतर गेल्या पाच महिन्यांपासून बदने कारागृहात होते. त्यांनी जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये अर्ज दाखल केला होता.
सुनावणीदरम्यान सरकार पक्ष आणि आरोपीच्या वकिलांनी आपापले युक्तिवाद सादर केले. तपासाची स्थिती, पुरावे आणि प्रकरणातील परिस्थिती यांचा सविस्तर विचार केल्यानंतर न्यायालयाने काही अटींसह बदने यांना जामीन मंजूर करण्याचा निर्णय दिला.
पुढील सुनावणीकडे लक्ष
या प्रकरणातील मुख्य आरोपीला जामीन मिळाल्यामुळे आता खटल्याच्या पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सहआरोपी प्रशांत बनकर याच्यासह इतर बाबींचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
फलटणमधील या संवेदनशील प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्र आणि पोलीस प्रशासनातही मोठी चर्चा सुरू असून, पुढील न्यायालयीन प्रक्रियेत आणखी कोणते तपशील समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


