मुंबई : प्रतिनिधी
शहरात व्हीआयपी असल्याचा बनाव करून बेकायदेशीरपणे फ्लॅशिंग दिवे (डोम लाईट्स) लावणाऱ्यांवर मुंबई वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई करत अवघ्या दोन दिवसांत ८० वाहनांवरील दिवे उतरवले. या विशेष मोहिमेत तीन सायरनही जप्त करण्यात आले असून नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
मुंबईत काही खासगी वाहन चालकांकडून लाल, निळे किंवा पिवळे फ्लॅशिंग दिवे लावून वाहतुकीतून मार्ग काढण्याचे प्रकार वाढले होते. यामुळे सामान्य नागरिक आणि पोलिसांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर १ आणि २ एप्रिल रोजी संपूर्ण शहरात विशेष मोहीम राबवण्यात आली.
या कारवाईत दक्षिण मध्य विभाग, मरीन ड्राईव्ह आणि वांद्रे वाहतूक विभागाच्या पथकांनी विविध ठिकाणी नाकाबंदी करत वाहनांची तपासणी केली. तपासणीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८० वाहनांवरील बेकायदेशीर डोम लाईट्स आणि ३ सायरन जप्त करण्यात आले.
पोलिस सहआयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे यांनी सांगितले की, यापुढेही अशा प्रकारच्या वाहनांवर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. गंभीर प्रकरणांमध्ये संबंधित वाहनांची नोंदणी रद्द करण्याची शिफारस आरटीओकडे केली जाईल, तसेच कायदेशीर गुन्हाही दाखल केला जाऊ शकतो.
मुंबईकरांना पोलिसांचे आवाहन
कोणत्याही खासगी वाहनावर अनधिकृत फ्लॅशिंग दिवे किंवा सायरन लावू नयेत. अशा वाहनांची माहिती नागरिकांनी छायाचित्रासह मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या अधिकृत सोशल मीडियावर किंवा हेल्पलाईनवर द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. शहर सुरक्षित ठेवण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.


