नाशिक प्रतिनिधी
महिलांचे लैंगिक शोषण तसेच जादूटोणा आणि तंत्रमंत्राच्या नावाखाली लोकांची फसवणूक केल्याच्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत असलेल्या आरोपी अशोक खरात याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. एका महिलेवर अत्याचार करून तिचा गर्भपात घडवून आणल्याच्या प्रकरणात सुनावणीदरम्यान सरकारी पक्ष आणि बचाव पक्ष यांच्यात जवळपास २० ते २५ मिनिटे जोरदार युक्तिवाद झाला.
सुनावणीच्या शेवटी न्यायालयाने आरोपीला “तुम्हाला काही बोलायचे आहे का?” असा थेट प्रश्न केला असता, खरातने हात जोडून “नाही” असे उत्तर दिले. ही सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली.
दरम्यान, महिलांचे लैंगिक शोषण आणि तंत्रमंत्राच्या नावाखाली फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, अशोक खरातने सुमारे १०० हून अधिक महिलांचे शोषण केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय, लोकांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याचेही आरोप आहेत. बुधवारी एका प्रकरणात न्यायालयाने खरातला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर आज आणखी एका गुन्ह्यात त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले.
सरकारी वकिलांचा युक्तिवाद
सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर मांडताना सांगितले की, आरोपीकडून महिलांचे लैंगिक शोषण करण्यासाठी ठरावीक मोडस ऑपरेन्डी वापरला जात होता. पीडित महिलेला गर्भपात करण्यासाठी दिलेली औषधे कुठून आणली, याचा तपास करणे आवश्यक आहे. तसेच पीडित महिलेच्या आई-वडिलांना धमकावल्याचाही आरोप आहे.
आरोपीने लोकांकडून आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेतले होते. ती कागदपत्रे नेमकी कशासाठी वापरली, याचाही तपास करणे गरजेचे आहे. शिवाय, तंत्रमंत्राच्या नावाखाली दिल्या जाणाऱ्या “मंतरलेल्या पाण्यात” नेमके काय मिसळले जात होते, हेही उघड करणे आवश्यक असल्याचे सरकारी पक्षाने नमूद केले.
आरोपी हा या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असून तो तपासात सहकार्य करत नसल्याचा दावा करत, पुढील तपासासाठी ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी न्यायालयाकडे केली.
बचाव पक्षाचा युक्तिवाद
दरम्यान, आरोपीचे वकील अॅड. भाटे यांनी सरकारी पक्षाच्या मागणीला विरोध केला. पहिल्या गुन्ह्यात आरोपीला आधीच सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. तसेच दुसऱ्या गुन्ह्यातही जवळपास तेच आरोप आहेत, असे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
२०२० ते २०२६ या कालावधीत घडलेल्या घटनांचा तपास आधीच करण्यात आला असून त्याचे तपशील रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहेत, असेही त्यांनी सांगितले. मात्र, संबंधित कागदपत्रे आणि एफआयआर वाचण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळाला नसल्याचा दावा बचाव पक्षाने केला.
गर्भपाताबाबत कायदेशीर प्रक्रियेचे पालन झाले की नाही, याचा तपास झाला आहे का? जादूटोणा विरोधी कायद्यानुसार नेमका कोणता तपास करण्यात आला? तसेच सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हिडिओंच्या आधारे बलात्कार आणि जादूटोण्याचे आरोप कशाच्या आधारे लावले, याबाबत स्पष्टता देण्याची मागणीही बचाव पक्षाने केली. त्यामुळे आरोपीला पुन्हा पोलीस कोठडी देऊ नये, अशी विनंती वकिलांनी न्यायालयाकडे केली.
कोर्टाचा थेट सवाल
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी अशोक खरातला थेट विचारले, “तुम्हाला काही बोलायचे आहे का?”
यावर खरातने हात जोडत शांतपणे “नाही” असे उत्तर दिले.
दरम्यान, या बहुचर्चित प्रकरणात पुढील तपास सुरू असून, आरोपीविरोधात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


