नवी मुंबई, प्रतिनिधी
राज्यातील सत्तासमीकरणांवर पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडवणारे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार वरून सरदेसाई यांनी केले आहे. शिंदे गटाकडून ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना सुरुवात झाल्यानंतर आता शिंदे गटातील काही आमदार-खासदारही आमच्या संपर्कात असल्याचा दावा सरदेसाई यांनी केला. त्यामुळे राज्यातील राजकारणात नव्या घडामोडींना तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबई महापालिका मुख्यालयात ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी सरदेसाई बोलत होते. यावेळी त्यांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका करताना राजकीय फोडाफोडीच्या चर्चांवरही प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी काही दिवसांपूर्वी नांदेड दौऱ्यात राज्यात लवकरच “ऑपरेशन टायगर” होण्याचे संकेत दिले होते. ठाकरे गटातील काही आमदार-खासदार आमच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी म्हटले होते. त्या विधानानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.
या पार्श्वभूमीवर आमदार वरुण सरदेसाई यांनी प्रतिउत्तर देताना म्हटले की, “राजकारणात संपर्कात असणं ही सामान्य बाब आहे. ते म्हणतात त्यांच्याकडे आमचे लोक संपर्कात आहेत, पण त्यांच्या गटातील अनेक लोकही आमच्या संपर्कात आहेत.” त्यांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही गटांमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
सरदेसाई यांनी पुढे सत्ताधाऱ्यांवर टीका करताना सांगितले की, “महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांकडे सुमारे २२० आमदारांचे बहुमत आहे, तर विरोधकांकडे अवघे ४० आमदार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीने सत्तेचा आणि पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर केला, हे सर्वांनी पाहिले आहे.”
यावेळी त्यांनी खोचक शब्दांत सत्ताधाऱ्यांना सवालही केला. “एवढं मोठं बहुमत असतानाही अजूनही दुसऱ्यांचे आमदार-कार्यकर्ते खेचून घेण्याची हाव का? तुमच्याकडे असलेले कार्यकर्ते घेऊन पुढे का जात नाही? वारंवार दुसऱ्यांनी घडवलेली माणसं खांद्यावर का घ्यावी लागतात?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, “ऑपरेशन टायगर” किंवा “ऑपरेशन तुतारी” या चर्चांवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही सत्ताधाऱ्यांवर टीका केली. “जनतेच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी सत्ताधारी फोडाफोडीच्या राजकारणात गुंतले आहेत. एवढे प्रचंड बहुमत असताना अशा प्रकारचे राजकारण का केले जात आहे, हे समजत नाही,” असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा केवळ राजकीय दबावतंत्र आहे की खरोखरच काही आमदारांची हालचाल सुरू आहे, याकडे आता राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


