पुणे प्रतिनिधी
भोंदू बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणात नाव समोर आल्यानंतर माजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले असले, तरी त्यांनी नाशिक येथे उपस्थित राहण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या नाशिक पोलीस अकॅडमीमध्ये सुरू असलेल्या एसआयटी चौकशीसाठी त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, “मी महिला आहे आणि नाशिकला येण्यासाठी प्रवासात खूप वेळ जातो,” असे कारण देत त्यांनी चौकशीसाठी नाशिकला येण्यास असमर्थता दर्शवली आहे. याउलट चौकशी पुणे किंवा मुंबईमध्ये घ्यावी, अशी मागणी त्यांनी तपास पथकाकडे केल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, महत्त्वाची बाब म्हणजे चाकणकर सध्या त्यांच्या पुण्यातील अधिकृत निवासस्थानी नसल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार त्या नाशिकमध्येच पोहोचल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेमुळे प्रकरणातील संशय अधिक गडद होत असून कॅप्टन अशोक खरात यांच्याशी त्यांचे नेमके संबंध काय, याबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, भोंदू बाबा म्हणून प्रसिद्ध असलेले अशोक खरात यांच्या कथित गैरव्यवहार आणि आर्थिक व्यवहारांबाबत मोठ्या प्रमाणात तपास सुरू आहे. या पार्श्वभूमीवर चाकणकर यांची चौकशी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
या मुद्द्यांवर होणार चौकशी
एसआयटीकडून चाकणकर यांची खालील महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चौकशी होण्याची शक्यता आहे-
• कॅप्टन अशोक खरात यांच्याशी ओळख कशी झाली आणि किती वर्षांपासून संपर्क होता?
• राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा पदावर असताना पदाचा किंवा कार्यालयाचा गैरवापर करून खरात यांना काही लाभ मिळवून दिले का?
• खरात यांनी उभारलेल्या स्थावर व जंगम मालमत्तेशी त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आहे का?
• खरात यांनी स्थापन केलेल्या चार-पाच कंपन्यांशी त्यांचे काही संबंध होते का?
• जलसंपदा खात्याकडून धरणातील पाण्याचा साठा आरक्षित करून ‘श्री शिवनिका’ संस्थेपर्यंत सुमारे ४० किलोमीटरची जलवाहिनी टाकण्यासाठी मदत केली होती का?
• सीए ललित पोफळे आणि चाकणकर यांच्यात संपर्क होता का?
• खरात यांचा आयपीओ मार्केटमध्ये आणण्याबाबत काही माहिती होती का?
• आजी-माजी मंत्री, आमदार, खासदार तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांचा कथित काळा पैसा पांढरा करण्यासाठी मदत करण्यात आली होती का?
• ‘श्री शिवनिका’ संस्थेला 80G अंतर्गत मिळालेल्या कोट्यवधींच्या निधीवर इन्कम टॅक्स सवलती मिळवून देण्यात काही भूमिका होती का?
• खरात यांच्या संपर्कातील पीडित महिलांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाला होता का?
तपास यंत्रणा या सर्व मुद्द्यांवर सखोल चौकशी करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, चाकणकर चौकशीसाठी कधी आणि कुठे हजर होणार याकडे आता राजकीय वर्तुळासह राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
एकीकडे एसआयटीचा तपास वेग घेत असताना, या प्रकरणात आणखी कोणाची नावे समोर येणार का याबाबतही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.


