नाशिक प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपासाचा वेग वाढत असतानाच नाशिक जिल्हा न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत आरोपी अशोक खरात याच्या पोलीस कोठडीत १ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. महिलांवरील अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीसारख्या गंभीर गुन्ह्यांमुळे गाजलेल्या या प्रकरणात विशेष तपास पथकाला (SIT) अधिक चौकशीसाठी वेळ देणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून नवनवीन पीडित महिला पुढे येत असल्याने तपास अधिक गुंतागुंतीचा होत चालल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयात स्पष्ट केले.
कोर्टात काय घडलं?
आज सकाळी सुमारे ११.३० वाजता कडक पोलीस बंदोबस्तात अशोक खरातला नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायमूर्ती एम. व्ही. भराडे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.
यावेळी SIT चे तपासी अधिकारी किरण सूर्यवंशी आणि सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी आरोपीच्या तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करत सविस्तर युक्तिवाद मांडला.
सरकारी पक्षाने न्यायालयाला सांगितले की-
• आरोपी तपासात सहकार्य करत नाही
• त्याच्या मोबाईलमध्ये अनेक संपर्क डमी नावांनी किंवा कोडवर्डमध्ये सेव्ह असण्याची शक्यता आहे
• या संपर्कांमध्ये काही राजकीय व्यक्तींचाही समावेश असू शकतो
• महिलांना दिले जाणारे ‘द्रव्य’ किंवा पाणी नेमके काय होते, याचा फॉरेन्सिक तपास करणे आवश्यक आहे
या सर्व मुद्द्यांवर अधिक चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे सरकारी पक्षाने स्पष्ट केले.
बचाव पक्षाचा जोरदार विरोध
दरम्यान आरोपीचे वकील सचिन भाटे यांनी पोलीस कोठडीला जोरदार विरोध दर्शवला. त्यांनी न्यायालयात सांगितले की-
“पोलीसांनी मोबाईल जप्त केला आहे आणि त्याची क्लोन कॉपीही मिळवली आहे. त्यामुळे पुन्हा पोलीस कोठडीची गरज नाही. तसेच आरोपीकडे सापडलेला रिव्हॉल्व्हरही परवानाधारक आहे.”
मात्र या युक्तिवादाला पीडित महिलेचे वकील एम. वाय. काळे यांनी तीव्र आक्षेप घेतला.
“आरोपीच्या कृत्यामुळे पीडित महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. या गंभीर गुन्ह्यांचा सखोल तपास होणे गरजेचे असून समाजाला न्याय मिळण्यासाठी पोलीस कोठडी अत्यावश्यक आहे,” असे त्यांनी न्यायालयात नमूद केले.
आतापर्यंत १० गुन्हे दाखल
अशोक खरातविरोधात आतापर्यंत एकूण १० गुन्हे दाखल झाले आहेत.
• ८ गुन्हे – महिलांवरील अत्याचाराशी संबंधित
• २ गुन्हे – आर्थिक फसवणूक
SIT ने न्यायालयाला सांगितले की या प्रकरणात अजूनही अनेक धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता आहे. खरातच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हरीचे काम फॉरेन्सिक टीमकडून सुरू असून त्यातील माहितीच्या आधारे आरोपीची समोरासमोर चौकशी करणे अत्यंत आवश्यक आहे.
तसेच आरोपीच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचा मागोवा घेण्याचे कामही सुरू असल्याचे तपास पथकाने स्पष्ट केले.
कोर्ट परिसरात कडेकोट बंदोबस्त
या हायप्रोफाइल प्रकरणामुळे आज नाशिक जिल्हा न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. SIT चे अधिकारी आणि पोलीस पथक तपासाशी संबंधित कागदपत्रांच्या फाईल्ससह कोर्टात दाखल झाले होते.
दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य आणि तपासाची व्याप्ती लक्षात घेत अशोक खरातला १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
आता लक्ष ‘कोडवर्ड’च्या रहस्याकडे
तपासादरम्यान आरोपीच्या मोबाईलमधील कोडवर्डमध्ये सेव्ह केलेली नावे, संभाव्य राजकीय संपर्क आणि पीडित महिलांना दिल्या जाणाऱ्या संशयित द्रव्याचा तपास यामुळे या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आता पुढील काही दिवसांत चौकशीतून अशोक खरात आणखी कोणाची नावे उघड करतो आणि या प्रकरणाची व्याप्ती किती वाढते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.


