मुंबई प्रतिनिधी
धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी मार्गावर उभारण्यात आलेला आगळावेगळा ‘संगीत रस्ता’ (म्युझिकल रोड) आता स्थानिक रहिवाशांसाठी त्रासदायक ठरू लागला आहे. गाड्यांच्या सततच्या वर्दळीमुळे दिवसातून शेकडो वेळा ऐकू येणारी ‘जय हो’ची धून रात्रीच्या शांततेत अधिक कर्कश वाटू लागल्याने नागरिकांनी महापालिकेकडे तक्रारींचा पाऊस पाडला होता. या पार्श्वभूमीवर रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत हा संगीत रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.
मुंबई किनारी मार्गावर नरिमन पॉईंटकडून वरळीकडे जाणाऱ्या उत्तर मार्गिकेवर हा ‘मेलडी रोड’ तयार करण्यात आला आहे. या मार्गावरील विशेष संगीत पट्ट्यांवरून ठराविक वेगाने वाहन चालविल्यास ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटातील प्रसिद्ध ‘जय हो’ या गाण्याची धून ऐकू येते. तांत्रिकदृष्ट्या अनोखा आणि पर्यटकांसाठी आकर्षण ठरणारा हा प्रयोग भारतात पहिल्यांदाच राबविण्यात आला आहे.
वरळीकडे जाणाऱ्या भूमिगत बोगद्यातून बाहेर पडताच दुभाजकाला लागून असलेल्या पहिल्या मार्गिकेवर सुमारे ५०० मीटर अंतरावर हे संगीत पट्टे बसविण्यात आले आहेत. वाहन ताशी सुमारे ७० ते ८० किलोमीटर वेगाने या पट्ट्यांवरून गेल्यास चाकांच्या घर्षणातून निर्माण होणाऱ्या ध्वनीलहरींमुळे ‘जय हो’ या गीताची धून ऐकू येते. रस्त्याच्या पृष्ठभागावर ठराविक अंतरावर आणि विशिष्ट आकारात तयार केलेल्या पट्ट्यांमुळे हा ध्वनी परिणाम साधला जातो.
मात्र, या मार्गावरून दिवस-रात्र हजारो गाड्यांची ये-जा होत असल्याने आसपासच्या रहिवाशांना वारंवार हीच धून ऐकावी लागत होती. रात्री उशिरापर्यंत वाहतूक सुरू असल्यामुळे नागरिकांच्या झोपेवर परिणाम होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या. ब्रीच कँडी सिटीझन फोरमसह अनेक स्थानिक संघटनांनी महापालिकेकडे याबाबत लेखी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पालिकेने रात्री १० नंतर सकाळी ६ पर्यंत संगीत मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळेत संगीत पट्ट्यांच्या बाजूने बॅरिकेड्स उभारून वाहने दुसऱ्या मार्गिकेकडे वळविण्यात येणार असल्याची माहिती पालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, मुंबईतील हा ‘मेलडी रोड’ देशातील पहिलाच प्रयोग ठरला आहे. या संकल्पनेची सुरुवात २००७ मध्ये जपानमध्ये झाली होती. जपानी अभियंता शिझुओ शिनोडा यांनी रस्त्यावरील कामादरम्यान ध्वनी निर्माण होण्याची ही वैशिष्ट्यपूर्ण पद्धत शोधून काढली. पुढे त्यातून ‘मेलडी रोड’ ही संकल्पना विकसित झाली. आजपर्यंत जपान, हंगेरी, दक्षिण कोरिया आणि संयुक्त अरब अमिरातीसारख्या देशांत असे प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत.
मुंबईत हा प्रयोग पर्यटकांसाठी आकर्षण ठरत असला, तरी रहिवाशांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याने रात्रीच्या वेळी ‘जय हो’ची धून थांबवण्याचा पालिकेचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या निर्णयानंतर स्थानिकांना रात्रीचा त्रास कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


