नाशिक प्रतिनिधी
अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपांमुळे अटकेत असलेला स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात सध्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) कसून चौकशीला सामोरा जात आहे. २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत असलेल्या खरातने चौकशीदरम्यान केलेल्या दाव्यांमुळे या प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळाले आहे.
महिलांशी केलेले कृत्य हे ‘विधी’ आणि ‘अध्यात्मिक प्रक्रियेचा भाग’ असल्याचा अजब दावा करत खरातने आपल्यावरचे आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणात लैंगिक शोषणासोबतच मोठ्या आर्थिक गैरव्यवहारांचेही धागेदोरे समोर येत असल्याने केंद्रीय तपास यंत्रणाही सक्रिय झाल्या आहेत.
चौकशीत ‘अंतर्मनाने दगा दिला’चा बचाव
एसआयटीच्या चौकशीदरम्यान खरातने अत्यंत विचित्र भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
“माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला. ज्यांचे मी भले केले तेच आज माझ्यावर उलटले,” असा दावा करत त्याने स्वतःला निर्दोष ठरवण्याचा प्रयत्न केला. यापुढे आपण ‘अंतर्मनाऐवजी मेंदूचे ऐकणार’ असल्याचेही त्याने चौकशीत सांगितल्याचे समोर आले आहे.
‘कोणावरही जबरदस्ती नाही, तो विधीच’
खरातवर आतापर्यंत १०० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात काही अल्पवयीन मुलींचाही समावेश असल्याची शक्यता तपासात व्यक्त करण्यात येत आहे.
तपासानुसार, खरात महिलांच्या मनात भीती निर्माण करत, विविध धार्मिक विधींचे कारण देत त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवत असल्याचे आरोप आहेत. मात्र पोलिसांसमोर त्याने “हे सर्व अध्यात्मिक विधीचा भाग होता, मी कोणावरही बळजबरी केली नाही,” असा दावा केला आहे.
‘हॉट रीडिंग’ आणि ‘कोल्ड रीडिंग’ने विश्वास जिंकत असे
खरात लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी मानसशास्त्रीय तंत्रांचा वापर करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
• हॉट रीडिंग : आधीच मिळवलेली वैयक्तिक माहिती वापरून समोरच्या व्यक्तीबद्दल अचूक माहिती सांगणे.
• कोल्ड रीडिंग : सामान्य प्रश्न विचारून व्यक्तीच्या प्रतिक्रियांवरून अंदाज बांधणे.
याशिवाय फेस रीडिंग, बॉडी लँग्वेज आणि मनोवैज्ञानिक दबावाचा वापर करून तो लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत असल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे.
भोंदूगिरीतून कोट्यवधींची माया
लैंगिक शोषणाच्या आरोपांबरोबरच आर्थिक गैरव्यवहारांचेही मोठे जाळे उघड होण्याची शक्यता आहे. तपासाचा भाग म्हणून खरातच्या ‘शिवानिका’ संस्थेचे बँक खाते गोठवण्यात आले आहे.
तसेच त्याच्या आणि कुटुंबीयांच्या नावावर राज्यभरात असलेल्या जमिनी, घरे आणि इतर मालमत्तांची माहिती तपास यंत्रणांनी गोळा केली आहे.
५२ मालमत्तांचा तपास
प्राथमिक तपासात नाशिक आणि नगर परिसरात त्याच्या नावावर किंवा संबंधित व्यक्तींच्या नावावर तब्बल ५२ मालमत्तांची माहिती समोर आली आहे. बनावट खडे, रत्न आणि मध विक्रीतून मोठ्या प्रमाणात पैसा कमावल्याचाही तपास सुरू आहे.
केंद्रीय यंत्रणांचाही तपास सुरू
या प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याने आता ईडी, फॉरेक्स आणि कस्टम विभागही सक्रिय झाले आहेत.
• २१ देशांच्या परदेश दौऱ्यांचा खर्च
• विदेशी चलन व्यवहार
• तुर्कस्थानसह विदेशातून आणलेल्या वस्तूंवरील कस्टम ड्युटी
याबाबतही तपास सुरू असून कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची कागदपत्रे ईडीकडे पाठवण्याची तयारी सुरू आहे.
दोन महिला अधिकाऱ्यांचाही उल्लेख
या प्रकरणात दोन उच्चपदस्थ महिला अधिकारीही खरातच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी स्वतःसह इतर महिलांनाही त्याच्याकडे नेल्याचा आरोप होत असून त्यामुळे त्या अडचणीत येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ती तक्रार दाखल करण्याच्या तयारीत असून एसआयटीशी संपर्क साधल्याचे समजते.
आरोग्याबाबतही धक्कादायक माहिती
सूत्रांच्या माहितीनुसार, दीड वर्षांपूर्वी खरातला अर्धांगवायूचा झटका आला होता. उत्तेजक औषधांच्या अतिसेवनामुळे त्याची प्रकृती बिघडली होती आणि शहरातील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. सध्या त्याच्या एका हाताची हालचाल मर्यादित असून चेहऱ्यावरही त्याचे परिणाम दिसून येतात.
आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता
भोंदूगिरी, लैंगिक शोषण, आर्थिक गैरव्यवहार आणि परदेशी व्यवहार अशा अनेक स्तरांवर हे प्रकरण विस्तारत असल्याने येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.


