मुंबई प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून एलपीजी (LPG) गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमांबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अफवा पसरत असल्याने ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. गॅस सिलिंडर बुक केल्यानंतर आता २५ ते ३५ दिवसांनीच डिलिव्हरी मिळणार, तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तब्बल ४५ दिवस प्रतीक्षा करावी लागणार, असे दावे काही पोस्ट्समध्ये करण्यात आले होते.
Clarification: LPG Refill Booking Timings
Reports circulating in sections of the news and on social media about changes in LPG refill booking norms are incorrect.
There is no change in LPG refill booking norms.
• Minimum gap between two refill bookings remains:
– 25 days in… pic.twitter.com/QqTlQYPaHp— Ministry of Petroleum and Natural Gas #MoPNG (@PetroleumMin) March 25, 2026
मात्र, या दाव्यांना केंद्र सरकारने स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले असून, एलपीजी सिलिंडर बुकिंगच्या नियमांमध्ये कोणताही नवीन बदल करण्यात आलेला नाही, असे पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
नेमकी अफवा काय होती?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही पोस्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंगसाठी आता वेगवेगळ्या प्रवर्गांनुसार प्रतीक्षा कालावधी लागू करण्यात आला आहे. त्यानुसार प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (PMUY) लाभार्थ्यांना ४५ दिवसांनीच सिलिंडर मिळेल, तर इतर ग्राहकांना २५ ते ३५ दिवस प्रतीक्षा करावी लागेल, असे सांगण्यात येत होते.
या दाव्यांमुळे अनेक ग्राहकांनी गॅस टंचाईची भीती व्यक्त करत तातडीने बुकिंग करण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले.
सरकारचा स्पष्ट खुलासा
या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने अधिकृत स्पष्टीकरण देत सांगितले की, गॅस बुकिंगसंदर्भातील जुनेच नियम सध्या लागू आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
सरकारच्या नियमानुसार –
• शहरी भागातील ग्राहकांसाठी गॅस सिलिंडर बुकिंगसाठी किमान २५ दिवसांचा कालावधी निश्चित आहे.
• ग्रामीण आणि दुर्गम भागांतील ग्राहकांसाठी हा कालावधी ४५ दिवसांपर्यंत असू शकतो.
हा नियम सर्व ग्राहकांना समानपणे लागू असून, उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी वेगळा किंवा भेदभाव करणारा कोणताही नियम नाही, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
पुरवठ्याबाबत घाबरू नका
दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर इराणमधील युद्धजन्य परिस्थिती आणि होर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्याच्या पार्श्वभूमीवर तेल आणि गॅस पुरवठ्याबाबतही काही चर्चा सुरू आहेत. त्यामुळे देशात एलपीजी गॅसची टंचाई निर्माण होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात होती.
मात्र, केंद्र सरकारने नागरिकांना आश्वस्त करत सांगितले की
• देशात एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध आहे
• गॅसच्या पुरवठ्यात कोणतीही कमतरता नाही
• नागरिकांनी घाबरून जाऊन पॅनिक बुकिंग करू नये
वेळेपूर्वी बुकिंग केल्यास काय होईल?
मंत्रालयाने आणखी एक महत्त्वाची बाब स्पष्ट केली आहे. जर एखाद्या ग्राहकाने मागील सिलिंडरच्या डिलिव्हरीच्या तारखेपासून ठरवलेल्या कालावधीपूर्वी गॅस बुक करण्याचा प्रयत्न केला, तर एजन्सीची ऑनलाइन प्रणाली ते बुकिंग आपोआप ब्लॉक करेल.
ही व्यवस्था शहरे, गावे तसेच दुर्गम भागांसाठी एकसमान लागू आहे.
परिस्थितीवर सरकारचे बारकाईने लक्ष
इराणमधील तणावपूर्ण परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर तेल आणि एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी केंद्र सरकार परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे.
सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.


