मुंबई प्रतिनिधी
मुंबईत वास्तव्यास असलेल्या कोकणवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन तातडीने पूर्ववत सुरू करण्याची मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या १५ ते २० दिवसांत ही मागणी मान्य न झाल्यास उत्तर प्रदेश आणि बिहारकडे जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्या रोखण्याचा इशारा मनसेने मंगळवारी दिला.
कोरोनाच्या काळात बंद करण्यात आलेली ही पॅसेंजर सेवा काही काळानंतर पुन्हा सुरू झाली असली तरी सध्या ती केवळ दिवा स्थानकापर्यंतच मर्यादित ठेवण्यात आली आहे. पूर्वी ही ट्रेन दादर ते रत्नागिरी अशी थेट धावत होती. मात्र रेल्वे प्रशासनाने कोणतेही ठोस कारण न देता तिचा मार्ग कमी केल्यामुळे मुंबईत राहणाऱ्या कोकणातील प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
यामुळे प्रवाशांना दादर किंवा मुंबईतील इतर भागातून प्रथम दिवा येथे जावे लागते आणि तेथून पुढे पॅसेंजर ट्रेन पकडावी लागते. त्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढत असून, विशेषतः कामानिमित्त मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही परिस्थिती अधिक त्रासदायक ठरत आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना रेल्वे प्रशासनावर जोरदार टीका केली. “कोकणात जाणाऱ्या सामान्य चाकरमान्यांसाठी दादर–रत्नागिरी पॅसेंजर ही जीवनरेखा आहे. ही सेवा पूर्ववत सुरू न केल्यास मनसेला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. १५ ते २० दिवसांत सकारात्मक निर्णय झाला नाही तर उत्तर प्रदेश आणि बिहारकडे जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्या रोखण्याचा आंदोलनात्मक इशारा आम्ही देत आहोत,” असे देशपांडे यांनी स्पष्ट केले.
मनसेचे आणखी एक नेते नितीन सरदेसाई यांनीही रेल्वे प्रशासनावर कठोर शब्दांत टीका केली. कोकण रेल्वेसाठी स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर जमीन दिली, मात्र आज त्याच कोकणवासीयांना योग्य सुविधा मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. “रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे की, दादरपर्यंत पॅसेंजर ट्रेन चालवल्यास लोकलच्या वेळापत्रकात अडथळे निर्माण होतात. मात्र हा युक्तिवाद आम्हाला मान्य नाही. योग्य नियोजन केल्यास ही सेवा सुरू ठेवणे शक्य आहे,” असे सरदेसाई म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, कोकणवासीयांचा सहनशीलपणा गृहित धरू नये. “मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, रस्त्यांची अवस्था खराब आहे आणि आता रेल्वे सेवेतही मर्यादा आणल्या जात आहेत. सरकार रो-रो सेवेसारख्या योजना जाहीर करते; पण पॅसेंजर ट्रेनसारख्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष का केले जाते?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी हा मुद्दा संसदेत का मांडला नाही, याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. कोकणवासीयांच्या हक्कासाठी मनसे संघर्ष करणार असून दादर-रत्नागिरी पॅसेंजर सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, या इशाऱ्यानंतर रेल्वे प्रशासन यावर कोणती भूमिका घेते, याकडे कोकणातील प्रवासी आणि चाकरमान्यांचे लक्ष लागले आहे.


