पुणे प्रतिनिधी
नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी 2026 चा किताब पटकावत डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला. अंतिम लढतीत त्याने महेंद्र गायकवाड याचा ४-३ अशा फरकाने पराभव केला. मात्र विजयानंतर अवघ्या काही मिनिटांतच सदगीरने मॅटवरील कुस्तीतून निवृत्ती जाहीर करत उपस्थितांना मोठा धक्का दिला.
पुण्यातील स्वर्गीय अजित पवार क्रीडा नगरी येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे अंतिम सामने पार पडले. गादी आणि माती या दोन्ही विभागातील लढती जिंकत सदगीर आणि गायकवाड अंतिम फेरीत पोहोचले होते. दोघेही वेगवेगळ्या जिल्ह्यांतील असले तरी पुण्यातील अर्जुन पुरस्कार विजेते प्रशिक्षक काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ते एकत्र सराव करतात. त्यामुळे अंतिम सामना अधिकच रंगतदार ठरणार, याची चाहत्यांना उत्सुकता होती.
अपेक्षेप्रमाणे अंतिम सामना अत्यंत अटीतटीचा झाला. मध्यंतरापर्यंत सामना १-१ अशा बरोबरीत होता. त्यानंतर उत्तरार्धात सदगीरने आक्रमक खेळी करत दोन गुणांची आघाडी घेतली. गायकवाडने शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देत दोन गुण मिळवले, मात्र वेळ संपल्यामुळे सदगीरने ४-३ अशा फरकाने विजय मिळवत किताब आपल्या नावे केला. गायकवाडला सलग दुसऱ्यांदा उपमहाराष्ट्र केसरी पदावर समाधान मानावे लागले.
सरकारवर नाराजी; नोकरी न मिळाल्याची खंत
विजयानंतर बोलताना सदगीरने राज्य सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली. २०२० मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकल्यानंतरही शासकीय नोकरी मिळाली नसल्याची खंत त्याने व्यक्त केली.
सदगीर म्हणाला, “मी तेव्हा साहेबांना भेटलो होतो. माझ्याकडे त्याचे पत्र आणि फोटोही आहेत. पण मला नोकरी मिळाली नाही. मात्र त्याची आता खंत नाही. आज मी डबल महाराष्ट्र केसरी होऊन दाखवलं. इतकं मोठं बक्षीस मिळाल्यानंतर मला आता नोकरीची गरज नाही.”
‘मला संपल्यात जमा केलं होतं’
आपल्या संघर्षाची आठवण सांगताना सदगीर भावूक झाला. “मला संपल्यात जमा केलं होतं, मी पैलवान नाही असं गणलं जात होतं. पण काका पवारांच्या तालमीत मेहनत करून मी आज हे यश मिळवलं. आज आनंदाने मी मॅटवरील कुस्तीतून निवृत्ती घेत आहे,” असे तो म्हणाला.
त्याने प्रतिस्पर्धी गायकवाडचेही कौतुक केले. “महेंद्र गायकवाड माझा लहान भाऊ आहे. तो जागतिक पदक विजेता आहे. तो परतल्यानंतर एकदा नाही तर तीनदा महाराष्ट्र केसरी होऊ शकतो. त्याने मेहनतीवर विश्वास ठेवला पाहिजे,” असे सदगीरने सांगितले.
मानाची चांदीची गदा आणि बक्षिसांची बरसात
महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावल्यानंतर सदगीरला मानाची चांदीची गदा, रोख पाच लाख रुपयांचे पारितोषिक आणि फॉर्च्युनर कार देऊन गौरविण्यात आले. विजयानंतर सदगीरने गायकवाडला मिठी मारत त्याच्याशी संवाद साधला आणि क्रीडास्पर्धेतील खेळाडूवृत्तीचे दर्शन घडवले.
डबल महाराष्ट्र केसरी ठरल्यानंतर तात्काळ निवृत्ती जाहीर केल्याने कुस्तीविश्वात आश्चर्य व्यक्त केले जात असून सदगीरच्या निर्णयावर क्रीडाप्रेमी आणि तज्ज्ञांमध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे.


