मुंबई प्रतिनिधी
नाशिकच्या भोंदूबाबा प्रकरणाचे राजकीय पडसाद आता राज्याच्या सत्ताकारणातही उमटू लागले आहेत. स्वयंघोषित अंकज्योतिषी अशोक खरात याच्याशी संबंधित वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली असून पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या पदावरही संकटाची छाया गडद होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी याबाबत तातडीची बैठक बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. या बैठकीत चाकणकर यांना महिला प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याचाही पर्याय चर्चेत आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
‘खरात’ वादाने राष्ट्रवादीत खळबळ
नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा प्रकरणात अशोक खरात याच्याशी संबंध असल्याचे आरोप झाल्यानंतर रुपाली चाकणकर या मोठ्या राजकीय अडचणीत सापडल्या. या आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा मलिन होत असल्याची चर्चा पक्षांतर्गत सुरू झाली आहे.
या पार्श्वभूमीवर शनिवारी उशिरा रात्री पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत खरात प्रकरणामुळे पक्षावर होणारी राजकीय झळ आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी काय पावले उचलावीत, यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
महिला आयोगाचा राजीनामा; पुढे काय?
खरात प्रकरणामुळे वाढत्या राजकीय दबावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा सल्ला दिल्याचे समजते. त्यानुसार शुक्रवारी चाकणकर यांनी आपला राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला.
यानंतर सुनेत्रा पवार यांनी हा राजीनामा स्वीकारण्याची शिफारस करत तो मुख्यमंत्र्यांकडे पाठवून दिल्याचे स्पष्ट केले. मात्र, आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतरही चाकणकर यांच्याकडे राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी कायम आहे. यामुळेच पक्षात आता ‘पुढचा निर्णय काय?’ याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
महिला प्रदेशाध्यक्षपद धोक्यात?
सूत्रांच्या मते, बैठकीत चाकणकर यांच्याकडे असलेले महिला प्रदेशाध्यक्षपदही चर्चेचा केंद्रबिंदू ठरले. खरात प्रकरणामुळे विरोधकांकडून पक्षावर सतत टीका होत असल्याने पक्षाची प्रतिमा वाचवण्यासाठी कठोर निर्णय घेण्याची मागणी काही नेत्यांनी केली.
पक्षातील काही नेत्यांकडून “चाकणकर यांनी पक्षातील पदावर राहू नये” अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू असल्याचेही समजते. त्यामुळे विरोधकांकडून आणखी राजकीय हल्ले होऊ नयेत यासाठी त्यांना महिला प्रदेशाध्यक्षपदावरून दूर करण्याचा पर्यायही विचाराधीन असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधिमंडळात ‘खरात’ वाद तापणार
दरम्यान, राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सोमवारपासून सुरू होत असून या अधिवेशनात खरात प्रकरणावरून मोठा राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.
विरोधी पक्ष या प्रकरणाला जोरदारपणे लावून धरण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकणकर यांचा महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा घेतला असला तरी विरोधक या प्रकरणावरून सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कोंडीत पकडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एकूणच, नाशिकच्या भोंदूबाबा प्रकरणाने आता केवळ सामाजिक नव्हे तर राजकीय वादळाचे रूप घेतले असून त्याचे पडसाद थेट सत्ताधारी आघाडीत उमटताना दिसत आहेत. येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसकडून चाकणकर यांच्या पदाबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागून राहिले आहे.


