मुंबई प्रतिनिधी
बांद्रा पूर्व येथील डॉ. भाऊसाहेब बळीराम हिरे महाविद्यालयातील इंटीरियर डिझाईन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना २०२४ पासून आजपर्यंत मान्यताप्राप्त पदवी व अधिकृत कागदपत्रे न मिळाल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. पदवी, गुणपत्रिका आणि अभ्यासक्रमाच्या मान्यतेबाबत स्पष्टता नसल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
या प्रकरणी बुधवारी मोठ्या संख्येने पालक, सध्याचे विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी महाविद्यालयाबाहेर एकत्र जमले. प्रशासनाकडून योग्य उत्तरांची मागणी करत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने महाविद्यालय प्रशासनाशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्या वेळी संस्थेचे विश्वस्त उपस्थित नसल्याने सविस्तर चर्चा होऊ शकली नाही. प्रशासनाकडून २३ मार्च रोजी पुन्हा येण्यास सांगण्यात आल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, इंटीरियर डिझाईन अभ्यासक्रमासाठी दरवर्षी सुमारे ८० हजार रुपये इतके शुल्क आकारले जाते. मात्र अभ्यासक्रम पूर्ण करूनही विद्यार्थ्यांना अद्याप अधिकृत पदवी किंवा पूर्ण गुणपत्रिका देण्यात आलेली नाही. त्यामुळे पुढील शिक्षण, नोकरी किंवा परदेशात शिक्षणासाठी अर्ज करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सुरुवातीला हा अभ्यासक्रम एका विद्यापीठाशी संलग्न असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र २०२४ मध्ये त्या विद्यापीठाची मान्यता रद्द झाल्याचे विद्यार्थ्यांना कळाले. त्यानंतर आता दुसऱ्या राज्यातील विद्यापीठाकडून पदवी दिली जाईल, असे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले. मात्र यासंदर्भात कोणतीही अधिकृत कागदपत्रे, करार किंवा विद्यापीठाची मान्यता विद्यार्थ्यांना दाखवण्यात आलेली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
काही विद्यार्थ्यांनी सांगितले की, महाविद्यालयाकडून देण्यात आलेल्या गुणपत्रिकांमध्येही अनेक त्रुटी आढळल्या आहेत. विषयांची नावे, परीक्षांचे तपशील आणि गुण यामध्ये विसंगती असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळाल्यानंतरही पदवी सादर करता येत नसल्याने नोकरीच्या संधी धोक्यात आल्या आहेत. काही विद्यार्थ्यांचे परदेशात उच्च शिक्षण घेण्याचे नियोजनही या गोंधळामुळे रखडले आहे.
दरम्यान, महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांना लवकरच पदवी देण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. बीएससी पदवीच्या गुणपत्रिका वितरित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र याबाबत कोणतेही ठोस वेळापत्रक किंवा अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता कायम आहे.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, तसेच महाविद्यालय प्रशासनाने तातडीने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी पालक आणि विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. परिस्थिती लवकर सुधारली नाही तर पुढील काळात तीव्र आंदोलनाचा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला आहे.


