पुणे प्रतिनिधी
पुण्यातील वाघोली येथे पार पडलेल्या ६८व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेने कुस्तीप्रेमींना रोमांचक क्षण दिले. अंतिम फेरीत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याच्यावर ४–३ असा थरारक विजय मिळवत दुसऱ्यांदा मानाची महाराष्ट्र केसरी गदा पटकावली. या विजयासह सदगीर हा महाराष्ट्रातील सातवा ‘डबल महाराष्ट्र केसरी’ ठरला.
अंतिम लढत अतिशय चुरशीची झाली. दोन्ही मल्लांनी आक्रमक खेळ करत गुणांसाठी झुंज दिली. अखेर शेवटच्या क्षणांमध्ये सदगीरने आघाडी कायम ठेवत विजय मिळवला. त्यामुळे महेंद्र गायकवाडला यंदाही उपमहाराष्ट्र केसरीवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे महेंद्र दुसऱ्यांदा उपमहाराष्ट्र केसरी ठरला असून पुन्हा एकदा त्याला अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागला.
सिकंदरवर मात करत फायनलमध्ये धडक
फायनलपूर्वी माती विभागाच्या अंतिम फेरीत महेंद्र गायकवाडने कोल्हापूरच्या सिकंदर शेख याचा ३–० असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. पहिल्याच राऊंडपासून महेंद्रने आक्रमक पवित्रा घेतला होता. सुरुवातीच्या मिनिटांत त्याने एक गुण मिळवला आणि त्यानंतर सिकंदरवर पकड मजबूत करत आणखी दोन गुण मिळवले. सिकंदरने जोरदार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र महेंद्रच्या दमदार बचावामुळे त्याला यश मिळू शकले नाही.
दुसऱ्या राऊंडमध्ये सिकंदरने जोरदार हल्ले करत गुणांची पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. पण ‘बाहुबली’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेंद्रने त्याचे सर्व डाव अयशस्वी ठरवत विजयावर शिक्कामोर्तब केले.
२०२२ च्या वादाची आठवण
सिकंदर आणि महेंद्र यांची कुस्ती पाहण्यासाठी प्रेक्षक विशेष उत्सुक होते. कारण महाराष्ट्र केसरी 2022 मध्येही हे दोघे माती विभागाच्या अंतिम फेरीत आमनेसामने आले होते. त्या वेळी पंचांच्या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला होता. अनेकांनी सिकंदरवर अन्याय झाल्याचे म्हटले होते. त्या लढतीतही महेंद्र विजयी ठरला होता, मात्र अंतिम फेरीत शिवराज राक्षे याच्याकडून त्याला पराभव पत्करावा लागला होता.
पराभवानंतरही जिंकली मने
या वर्षीही इतिहास काहीसा तसाच घडला. महेंद्रने सिकंदरला हरवत फायनल गाठली; मात्र अंतिम लढतीत त्याला सदगीरकडून पराभव पत्करावा लागला. तरीही महेंद्रने खेळाडूवृत्तीचे दर्शन घडवत सर्वांची मने जिंकली.
सिकंदरवर विजय मिळवल्यानंतर महेंद्रने थेट त्याच्या पाया पडत हात जोडले. या भावनिक क्षणाने संपूर्ण आखाडा भारावून गेला. सिकंदरनेही मोठेपणा दाखवत महेंद्रच्या पाठीवर थाप मारत त्याचे कौतुक केले.
कुस्तीच्या आखाड्यात विजय-पराभव असतोच; मात्र प्रतिस्पर्ध्याविषयीचा आदर जपणारी ही घटना कुस्तीप्रेमींसाठी विशेष ठरली. त्यामुळे अंतिम फेरीत पराभव झाला असला, तरी महेंद्र गायकवाड हा चाहत्यांच्या मनात खऱ्या अर्थाने हिरो ठरल्याची भावना कुस्तीप्रेमींमध्ये व्यक्त होत आहे.


